Sangli: विधवांचा सन्मान अन् पुस्तकांचा मानपान, वांगी येथील अनोखा सत्यशोधक विवाह चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 15:52 IST2025-05-27T15:51:39+5:302025-05-27T15:52:08+5:30
प्रत्येक पाहुण्याला ‘शेतकऱ्याचा आसूड’ व महापुरुषांची पुस्तके भेट देऊन त्यांचे स्वागत केले

Sangli: विधवांचा सन्मान अन् पुस्तकांचा मानपान, वांगी येथील अनोखा सत्यशोधक विवाह चर्चेत
मोहन मोहिते
वांगी : ना मानपान, ना देवाण-घेवाण, ना वाजंत्री, ना गलबलाट अशा वातावरणात विचारांचा आहेर देत सांगली जिल्ह्यातील वांगी (ता. कडेगाव) येथे अनोखा विवाह पार पडला. पाहुण्यांना पुस्तकांची भेट अन् विधवांना सुवासिनीचा मान देत हळद दळणाचा कार्यक्रम करून नव्या विवाह प्रथेची मुहूर्तमेढ या सोहळ्यातून रोवण्यात आली.
आभासी प्रतिष्ठेपायी कर्ज काढून आपल्या मुला-मुलींची लग्न करणारे लाखो लोक आपल्याला पाहायला मिळतील. कधी लग्नात पाण्यासारखा पैसा खर्च करून श्रीमंतीचं प्रदर्शन केलं जातं, तर कधी पैशांचं ओंगळवाणं दर्शन घडवणारे अनेक विवाह सोहळे पार पाडले जातात. मात्र, वांगी येथील परशुराम माळी या शेतकऱ्याने या चुकीच्या परंपरांवर विचारांचा आसूड ओढत नव्या प्रथेला जन्म दिला.
त्यांनी त्यांच्या विजय या मुलाचा सोमवारी केलेला अनोखा विवाह समाजात चर्चेचा विषय ठरला आहे. प्रत्येक पाहुण्याला ‘शेतकऱ्याचा आसूड’ व महापुरुषांची पुस्तके भेट देऊन त्यांचे स्वागत केले. महात्मा बसवेश्वर व राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त व नववधू पूनम माळी हिचा वाढदिवस हाच मुहूर्त समजून हा विवाह सोहळा पार पडला. सत्यशोधक पद्धतीने कमी खर्चात विवाह करून एक नवा आदर्श त्यांनी घालून दिला आहे.
या विवाहास आमदार अरुण लाड, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील, हर्षवर्धन पाटील, ॲड. सुभाष पाटील, मोहनराव यादव, व्ही. वाय. पाटील, सुरेश मोहिते, सरपंच वंदना सूर्यवंशी, शशिकांत माळी, महादेव होवाळ उपस्थित होते.
असा झाला विवाह सोहळा
मुलीकडून मुलाला कोणतीही वस्तू भेट म्हणून दिली नाही. मानपान नाही. भांडी, वाजंत्री, वरात, घोडे असा कोणताही डामडौल नाही. मुहूर्तमेढ नाही, भटजी नाही, हार-तुरे नाहीत. मंगलाष्टक नाहीत. हळद दळण्याचा कार्यक्रमही विधवांच्या हस्ते करण्यात आला.
शेतकऱ्यांची व्यथा काय असते, हे मी स्वतः भोगले आहे. त्यामुळे विवाहासारख्या गोष्टींवर पैसा वायफळ खर्च करणे चुकीचे आहे. हाच पैसा शेतकऱ्यांनी मुलांच्या शिक्षणावर, शेतीच्या विकासावर खर्च करावा. यासाठी मी माझ्या दोन मुलांचे विवाह सत्यशोधक पद्धतीने केले आहेत. - परशुराम माळी, वराचे वडील