सांगलीतील तुरचीमध्ये आढळला रंगीत गळ्याचा सरडा -video
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2025 19:26 IST2025-08-13T19:26:45+5:302025-08-13T19:26:59+5:30
मागील दोन पायांवर उभा राहून टेहळणी

सांगलीतील तुरचीमध्ये आढळला रंगीत गळ्याचा सरडा -video
सांगली : तुरची (ता. तासगाव) येथे वैशिष्ट्यपूर्ण असा दुर्मीळ फॅन थ्रोटेड लिझार्ड म्हणजेच रंगीत गळ्याचा सरडा आढळला. भारती रुग्णालयाच्या मागील बाजूच्या धोंडोळी माळ परिसरातील महेश मदने यांच्या शेतात तो दिसून आला.
हा सरडा आकाराने पालीपेक्षा लहान होता. मातकट- तपकिरी रंगाचा वैशिष्ट्यपूर्ण रंगीत गळा व त्यावर रंगीबेरंगी मोरपंखी निळ्या, काळ्या, केसरी रंगाची पंख्यासारखी पिशवी असा हा सरडा पाहता क्षणी लक्ष वेधून घेणारा होता. निसर्ग अभ्यासक मदने यांनी सांगितले की, विणीच्या हंगामात मादीला आकर्षित करण्यासाठी तसेच संकटामध्ये बचावासाठी तो आपल्या गळ्यावरील पंख्याच्या आकाराची रंगीत पिशवी फुगवतो. त्यामुळेच याला रंगीत गळ्याचा सरडा हे नाव पडले असावे.
सहसा गवताळ माळराने, डोंगर, टेकड्या, दगडगोट्यांचा परिसर हा त्याचा आवडता रहिवास आहे. प्रत्येक पायाला चारच बोटे असून पुढील पायापेक्षा मागील पाय लांब आणि मजबूत असतात, त्यामुळे मागील दोन पायांवर उभा राहून तो टेहळणी करताना आढळतो.