खेळताना पाण्याच्या बादलीत पडून चिमुकलीचा मृत्यू, सांगली जिल्ह्यातील मांजर्डे येथील दुर्दैवी घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2025 13:47 IST2025-09-05T13:46:51+5:302025-09-05T13:47:04+5:30
तन्वी ही घरातील एकुलती एक मुलगी

खेळताना पाण्याच्या बादलीत पडून चिमुकलीचा मृत्यू, सांगली जिल्ह्यातील मांजर्डे येथील दुर्दैवी घटना
मांजर्डे : मांजर्डे (ता. तासगाव) येथील तन्वी शिवाजी कदम (घोटकर) (वय १ वर्ष) ही मुलगी सकाळी घरात खेळत असताना बादलीमध्ये पडली आणि त्यामध्ये तिचा मृत्यू झाला. गुरुवारी सकाळी १० च्या दरम्यान ही घटना घडली. एकुलत्या एक मुलगीच्या मृत्यूमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, गावातील पत्रावस्ती भागात शिवाजी कदम हे आपल्या कुटुंबासह राहतात. त्यांना एक वर्षाची तन्वी नावाची मुलगी होती. गुरुवारी सकाळी नेहमीप्रमाणे तन्वी घरात खेळत होती. आई घरकामात व्यस्त होती. रांगत रांगत तन्वी पाण्याने भरलेल्या बादली जवळ गेली. अचानक ती बादलीमध्ये पडली. ही घटना लक्षात येताच आईने तिला बाहेर काढले. तत्काळ पतीस दूरध्वनी करून बोलावून घेतले. त्यांनतर कुटुंबीयांनी तन्वीला तासगाव येथील दवाखान्यात दाखल केले. यावेळी डॉक्टरांनी तिला मयत घोषित केले.
कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला
तन्वी ही घरातील एकुलती एक मुलगी होती. ती घरातील आई व वडिलांसह अन्य सदस्यांची लाडकी होती. दररोज अंगणात बागड असलेल्या तन्वीचा अचानक मृत्यू झाल्यामुळे संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. पोटच्या गोळ्याचा मृत्यू झाल्याचे समजताच आईने हंबरडा फोडला होता.