वयोवृद्ध वडिलांना उपाशी ठेवले; मुलाविरोधात गुन्हा दाखल; सांगली जिल्ह्यातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2025 18:01 IST2025-07-26T17:59:15+5:302025-07-26T18:01:40+5:30
प्रांताधिकाऱ्यांच्या आदेशाकडे दुर्लक्षित करत उलट त्याने वडिलांना घराबाहेर काढण्याची धमकी दिली

संग्रहित छाया
आटपाडी : वयोवृद्ध पित्याला जेवण न देणे, वैद्यकीय खर्च न करणे आणि मानसिक त्रास देत घराबाहेर काढण्याची धमकी देणाऱ्या मुलाविरोधात आटपाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना राजेवाडी (ता. आटपाडी) येथील नाना दशरथ शिरकांडे (वय ७६) यांच्याबाबतीत घडली.
नाना शिरकांडे यांनी आपला मुलगा कृष्णा नाना शिरकांडेविरोधात प्रांताधिकारी विटा यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली होती. त्यांच्या तक्रारीनुसार, मागील दोन वर्षांपासून मुलगा कृष्णा वडिलांकडे दुर्लक्ष करत असून त्यांना जेवण न देणे, औषधोपचार खर्च टाळणे आणि सतत मानसिक त्रास देणे असे त्याचे वागणे आहे. या तक्रारीवर सुनावणी करत प्रांताधिकारी विटा यांनी १४ जून २०२५ रोजी आदेश काढून मुलास वडिलांना दरमहा ३ हजार रुपये निर्वाह भत्ता देण्याचे निर्देश दिले होते.
मात्र, हा आदेश दुर्लक्षित करत मुलाने एकही रुपया वडिलांना दिला नाही, उलट त्याने वडिलांना घराबाहेर काढण्याची धमकी दिली. या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांनी तत्काळ कारवाई करत ‘ज्येष्ठ नागरिक व पालकांचे पालनपोषण व कल्याण अधिनियम २००७’ मधील कलम २४ तसेच भारतीय न्यायसंहिता २०२३ च्या कलम ३५३(२) आणि ३५१(३) अंतर्गत कृष्णा शिरकांडे याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे राजेवाडी परिसरात संताप व्यक्त केला जात असून वृद्ध पालकांच्या संरक्षणासाठी कडक कारवाईची मागणी होत आहे.