Sangli: मांगरूळमध्ये पकडलेल्या बछड्याचा पुण्याला उपचारासाठी नेताना मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 19:29 IST2025-11-20T19:29:04+5:302025-11-20T19:29:36+5:30
स्थानिक, वनविभागाचे प्रयत्न निष्फळ

Sangli: मांगरूळमध्ये पकडलेल्या बछड्याचा पुण्याला उपचारासाठी नेताना मृत्यू
शिराळा : मांगरूळ (ता. शिराळा) येथील चिंचेश्वर मंदिराशेजारील नागरी वसाहतीत मंगळवार, १८ नोव्हेंबर रोजी आढळलेल्या बिबट्याच्या सहा महिन्यांच्या बछड्याला वनविभागाने सलग पाच तासांच्या अथक प्रयत्नानंतर रेस्क्यू केले. मात्र, दुर्देवाने उपचारासाठी पुणे येथील रेस्क्यू रुग्णालयात नेत असताना, त्वचारोगामुळे त्याचा रस्त्यातच मृत्यू झाला. त्यामुळे वनविभाग आणि स्थानिकांनी केलेले सर्व प्रयत्न निष्फळ ठरले.
मांगरूळ येथील ग्रामस्थांनी बछडा चिंचेश्वर मंदिराशेजारील एका पडीक जमिनीत असल्याची माहिती फोनद्वारे वनविभागाला दिली. माहिती मिळताच वनपाल अनिल वाजे, रजनीकांत दरेकर, दत्तात्रय शिंदे, प्राणीमित्र प्रा. सुशीलकुमार गायकवाड, रेस्क्यू पथकाचे वनसेवक मारुती पाटील, संजय पाटणकर, अमर पाटील तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
वनविभागाच्या टीमने सर्वप्रथम आजूबाजूचा परिसर बंदिस्त करून ग्रामस्थांना सुरक्षित बाजूला केले. बछडा सतत जागा बदलत असल्याने ते गवतात लपले होते. सलग पाच तास शोध घेतल्यानंतर वनविभागाला त्याला ताब्यात घेण्यात यश आले.
वनविभागाच्या कार्यालयाजवळ अंत्यसंस्कार
उपवनसंरक्षक सागर गवते, सहायक वनसंरक्षक नवनाथ कांबळे, वनक्षेत्रपाल एकनाथ पारधी यांच्या मार्गदर्शनाखाली हे रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात आले. त्यानंतर बछड्याला शिराळा येथील वनविभागाच्या कार्यालयात आणून पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. शुभांगी अरगडे, डॉ. अनिल पारधी यांनी तातडीने प्राथमिक उपचार केले.
रात्री उशिरा अधिक उपचारांसाठी रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्ट पुणे येथे वनपाल अनिल, रजनीकांत दरेकर, दत्तात्रय शिंदे व प्राणीमित्र सुशीलकुमार गायकवाड, प्रतीक यांनी रात्री २ वाजता विशेष वाहनातून नेले. मात्र, त्याचा रात्री रस्त्यातच मृत्यू झाला. मृत बछड्यावर शिराळा येथील वनविभागाच्या कार्यालयाजवळ शवविच्छेदन करून नंतर अंत्यसंस्कार करण्यात आले.