Sangli: मातेच्या यकृत दानातून पोटच्या गोळ्याला मिळाले जीवनदान
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 17:58 IST2025-05-20T17:58:25+5:302025-05-20T17:58:54+5:30
विट्यातील तरुणाची दुर्मीळ आजारातून मुक्तता

Sangli: मातेच्या यकृत दानातून पोटच्या गोळ्याला मिळाले जीवनदान
सांगली : विटा येथील रोहन रमेश पवार या विशीतल्या तरुणाचे ‘विल्सन डिसिज’ या दुर्मीळ आजाराने यकृत निकामी होण्याच्या अंतिम टप्प्यात होते. वेळ हातातून निसटून चालली होती आणि रोहनची तब्येतही ढासळत होती. याचवेळी त्याची आई सविता पवार यांनी पोटच्या गोळ्याला वाचवण्यासाठी यकृत दान करण्याचा धाडसी निर्णय घेतला. मुंबईतील हॉस्पिटलमध्ये यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वी झाली.
विट्यातील रोहनला ११ वर्षाचा विल्सन डिसिज हा यकृताचा दुर्मीळ आजार झाला. यामुळे विषारी कॉपर शरीरात साचून राहते. त्याचा परिणाम यकृत निकामी होऊ लागते. गोळ्या, औषधांनी आजार थोपविण्याचा प्रयत्न केला. परंतु रोहनला २० वर्षाचा झाल्यानंतर आजारामुळे जास्त त्रास होऊ लागला. सांगलीतील डॉ. अभिजित माने यांनी मुंबईतील सेंट्रल येथील वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये रोहनला पाठवले. डॉ. स्वप्निल शर्मा यांच्या टीमच्या देखरेखीखाली तपासणी केली. तेव्हा यकृत प्रत्यारोपणच रोहनला वाचवू शकते असे निदान झाले.
कोणीतरी अवयवदान करेल याची प्रतीक्षा करण्याएवढा वेळ नव्हता. त्यामुळे कुटुंबीयांना याची माहिती दिली. आई सविता यांची तपासणी केल्यानंतर त्या यकृत देण्यास सक्षम असल्याचे स्पष्ट झाले. त्यांनी मुलाला वाचवण्यासाठी यकृत दान करण्याचे धाडस दाखवले. दोन महिन्यापूर्वी डॉ. स्वप्निल शर्मा, डॉ. अभिजित माने, डॉ. मिनोती यांनी गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी केली. गुंतागुंत असूनही रक्त न चढविता शस्त्रक्रिया पार पडली. त्यामुळे रोहनला जीवनदान मिळाले.
माझा मुलाचा जीव वाचण्यासाठी यकृत प्रत्यारोपणाची गरज होती. आई म्हणून मला माझा मुलगा जिवंत पाहायचा होता. त्यामुळे इतर कोणताही विचार न करता माझ्या यकृताचा भाग त्याला देण्याचा निर्णय घेतला. -सविता पवार, आई
माझे आई-वडील हे माझ्यासाठी देवमाणूसच आहेत. माझ्या आईने खंबीरपणाने मला यकृत दान केल्यामुळे जगण्याची संधी मिळाली. माझ्या आईचे ऋण मी कधीच फेडू शकणार नाही. -रोहन पवार, मुलगा
आपल्या देशात अवयवदानाचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे अवयव मिळण्याची प्रतीक्षा करताना ५० टक्के लोक दगावतात. ज्या रुग्णाला अवयवाची गरज आहे, त्या कुटुंबातील कोणी अवयवदान करण्याचे धाडस दाखविल्यास जीव वाचू शकतो. रोहनच्या आईने यकृतातील काही भाग दान केला. हा भाग पुन्हा पूर्ववत होऊ शकतो. रोहनच्या आईने हिम्मत दाखवल्यामुळे त्याला जीवनदान मिळाले. -डॉ. स्वप्नील शर्मा