Sangli-Local Body Election: ज्येष्ठ, दिव्यांगांना व्हीलचेअर, महिलांसाठी ८ पिंक मतदान केंद्रे
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2025 19:01 IST2025-12-01T18:59:58+5:302025-12-01T19:01:44+5:30
२९१ मतदान केंद्रे : पिंक मतदान केंद्रांवर महिला अधिकारी, कर्मचारी असणार कार्यरत

संग्रहित छाया
सांगली : जिल्ह्यातील सहा नगरपरिषद आणि दोन नगरपंचायत निवडणुकीत दिव्यांग आणि ८५ वर्षांवरच्या ज्येष्ठ नागरिक मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी जिल्हा निवडणूक यंत्रणेनं विशेष सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
यामध्ये व्हीलचेअर, मतदान केंद्रांत जिन्यांवर चढण्यासाठी सरकत्या व्हीलचेअर यांसारख्या सुविधांचा समावेश आहे. या मोफत सुविधा मिळवण्यासाठी दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिक मतदारांनी सक्षम ॲपद्वारे आवश्यक मागणी नोंदवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे. तसेच २९१ मतदान केंद्रांपैकी आठ मतदान केंद्रे विशेष असणार आहेत.
जिल्ह्यातील उरुण-ईश्वरपूर, आष्टा, पलूस, तासगाव, विटा, जत या नगरपरिषद आणि शिराळा, आटपाडी नगरपंचायतीच्या निवडणुकीत दोन लाख ५७ हजार ९७७ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात २९१ मतदान केंद्र निश्चित केली आहेत. यामधील प्रत्येक पालिका निवडणुकीच्या ठिकाणी पिंक, युथ, दिव्यांग असे आठ मतदान केंद्र हे विशेष असणार आहे. यात आठ पिंक मतदान केंद्रांवर महिला अधिकारी, कर्मचारी कार्यरत राहतील.
दिव्यांग मित्र
दिव्यांग मतदारांना मदत करण्यासाठी दिव्यांग मित्र समन्वयकांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतदानाच्या दिवशी दिव्यांग मतदारांसाठी व्हीलचेअरसह मूलभूत सुविधांची सोय केली आहे.
जिल्ह्यात २९१ मतदान केंद्रे
जिल्ह्यातील उरुण-ईश्वरपूर नगरपरिषदेमध्ये ६७ मतदान केंद्रे, विटा ४९, आष्टा ३७, तासगाव ३६, जत ३४, पलूस २६, शिराळा नगरपंचायतीत १७, आटपाडी २५ अशी २९१ मतदान केंद्रे आहेत.
ज्येष्ठ दिव्यांगांसाठी केंद्रावर रॅम्प, व्हीलचेअर
जिल्ह्यातील २९१ मतदान केंद्रांवर ज्येष्ठ दिव्यांगांना मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी रॅम्प, व्हीलचेअरची व्यवस्था केली आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
मतदान केंद्रावर गरोदर, लेकुरवाळ्या महिलांचीही सुविधा
‘अत्यावश्यक किमान सुविधांची’ संख्या यावर्षी दुप्पट करण्यात आली आहे. मेडिकल किट, मतदान केंद्रांवर सावलीची व्यवस्था, दिव्यांग तसेच गर्भवती महिला मतदारांसाठी स्वयंसेवकांची मदत, लहान मुलांसाठी पाळणाघर, अंध आणि दिव्यांग मतदारांसाठी रांगेचे व्यवस्थापन या सुविधा यावर्षी नव्याने करण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे.
वीज, पिण्याचे पाणी, शौचालय उपलब्ध
निवडणुकीसाठी प्रत्येक बूथनिहाय, मतदान केंद्रावर वीज, पाणी, रॅम्प, फर्निचर, शौचालय, व्हीलचेअर या सर्व अत्यावश्यक बाबी उपलब्ध असल्याचे निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
जिल्ह्यात आठ ‘पिंक’ मतदान केंद्रे
प्रत्येक पालिका निवडणुकीच्या ठिकाणी पिंक आठ मतदान केंद्र हे विशेष असणार आहेत. यात आठ पिंक मतदान केंद्रांवर महिला अधिकारी, कर्मचारी कार्यरत राहतील.