Local Body Election: सांगली जिल्ह्यात आठ नगरपालिकांच्या १८९ जागांसाठी ६३५ उमेदवार रिंगणात
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2025 18:43 IST2025-11-22T18:42:35+5:302025-11-22T18:43:17+5:30
नगराध्यक्षपदाच्या ८ जागांसाठी ४१ उमेदवार : नगरसेवकपदाच्या १८१ जागांसाठी ५९४ जण मैदानात

Local Body Election: सांगली जिल्ह्यात आठ नगरपालिकांच्या १८९ जागांसाठी ६३५ उमेदवार रिंगणात
सांगली : सहा नगरपरिषद आणि दोन नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदाच्या आठ जागांसाठी ४१ तर नगरसेवक पदाच्या १८१ जागांसाठी ५९४ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत शुक्रवारी संपुष्टात आल्यानंतर लढतीचे चित्र स्पष्ट झाले.
नगराध्यक्षपदासाठी दाखल २८ आणि नगरसेवकपदासाठी दाखल ३४७ अपक्षांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. पण, काही बंडखोरांना थंड करण्यात सर्वच प्रमुख पक्षांतील नेत्यांना अपयश आल्याचे दिसून आले. आष्टा नगरपरिषदेत नगराध्यक्षपदासाठी दोनच अर्ज राहिल्यामुळे दुरंगी लढत असून उर्वरित सात ठिकाणी तिरंगी सामना रंगणार आहे.
नगराध्यक्षपदासाठी दाखल झालेल्या तब्बल १११ अर्जांपैकी ३७ अर्ज अपात्र तर ६९ अर्ज पात्र ठरले होते. यापैकी शेवटच्या दिवशी २८ उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यामुळे ४१ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. नगरसेवकपदाच्या १८१ जागांसाठी चक्क एक हजार ५६७ अर्ज दाखल होते. छाननीमध्ये ६२६ अर्ज अपात्र ठरल्यामुळे ९४१ अर्ज पात्र ठरले होते. नगरसेवकपदाच्या निवडणुकीतून शुक्रवारी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी ३४७ उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे ५९४ उमेदवार रिंगणात राहिले आहेत.
पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरुद्ध बंडखोरी करून अर्ज भरलेल्यांची मनधरणी करण्यासाठी राजकीय ‘फिल्डिंग’ लावण्यास सुरुवात झाली होती. नेत्यांच्या प्रयत्नानंतर नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीतून अनेक बंडखोरांनी माघार घेतली. अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत संपल्यामुळे उरुण-ईश्वरपूर, आष्टा, पलूस, तासगाव, विटा, जत नगरपरिषद आणि शिराळा, आटपाडी नगरपंचायतीच्या निवडणुकीत पक्षाच्या उमेदवारांनी एबी फॉर्म दिल्यामुळे त्या उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. पण, अपक्ष उमेदवारांना २६ नोव्हेंबरला चिन्ह मिळणार आहे. त्यानंतर त्यांचा प्रचार सुरु होणार आहे.
नगरपरिषद, नगरपंचायतीसाठी रिंगणातील उमेदवार
नगरपरिषद-नगरपंचायत / नगराध्यक्षपदासाठी/ नगरसेवकपदासाठी
उरुण-ईश्वरपूर / ६/ ९४
विटा / ३ / ६९
आष्टा / २ / ७२
तासगाव /५ / ८८
जत/७ / ९४
पलूस/६ / ६७
शिराळा/८ / ५०
आटपाडी/४ / ६०