गुन्हेगारीवर कोणाचा पडदा?, सांगली जिल्ह्यात पाच दिवसाला एकाचा मुडदा; ११ महिन्यांत ६० खून
By घनशाम नवाथे | Updated: November 13, 2025 19:24 IST2025-11-13T19:23:38+5:302025-11-13T19:24:37+5:30
वाढत्या खुनाच्या घटनांनी पोलिस हादरले, नागरिक घाबरले

गुन्हेगारीवर कोणाचा पडदा?, सांगली जिल्ह्यात पाच दिवसाला एकाचा मुडदा; ११ महिन्यांत ६० खून
घनशाम नवाथे
सांगली : नशेखोरी, पूर्ववैमनस्य आणि वैयक्तिक वादातून यंदाच्या वर्षात एक दोन नव्हे, तर तब्बल ६० खून झाले आहे. यंदाच्या वर्षात खुनाच्या वाढत्या घटनांनी पोलिसही हादरले आहेत. पाच दिवसाला एक खून होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मध्यंतरी कुपवाड, इस्लामपूर खून सत्राने चर्चेत आले होते, परंतु सांगली परिसरात महिनाभरात पाच खून झाल्याने खळबळ उडाली आहे.
जिल्ह्यात गतवर्षी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक काळात पोलिसांनी केलेल्या प्रतिबंधात्मक कारवाईचा परिणाम म्हणून खून वगळता इतर गुन्ह्याचे प्रमाण यंदाच्या वर्षात घटले, परंतु दुसरीकडे खुनाचे प्रमाण वाढतच चालले आहे. चार महिन्यांपूर्वी जिल्ह्यात पाच दिवसाला एक खून असे प्रमाण दिसून येत होते. चार महिन्यांनंतर हे प्रमाण कमी झालेले नाही. सद्यस्थितीत पाच दिवसाला एकाचा मुडदा पाडला जात आहे. खुनाची कारणे वेगवेगळी असली, तरी वाढते प्रमाण निश्चितच चिंताजनक आहे.
यंदाच्या वर्षात आजअखेर तब्बल ६० जणांचा खून झाला आहे, तर खुनी हल्ल्याच्या घटनाही जवळपास तेवढ्याच आहेत. अकरा महिन्यांत ६० जणांचा खून झाल्याचे प्रमाण निश्चितच पोलिस दलाला इशारा देण्याइतपत गंभीर म्हणावे लागेल. पाच दिवसाला एक खून होत असल्यामुळे पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. या खुनातील आरोपींना पकडले असले, तरी या खुनाच्या घटनांमुळे गुन्हेगारीत भर पडली आहे. गुन्हेगारांची संख्याही वाढली आहे.
११ महिन्यांत तब्बल ६० खून झाल्यामुळे पोलिसांना आता याची गांभीर्याने दखल घ्यावी लागेल. ६० खुनांपैकी जवळपास १८ ते २० खून हे वर्चस्ववाद, टोळीयुद्ध आणि गुन्हेगारी यातून झाले आहेत, तर इतर खून हे वैयक्तिक कारणातून झाले आहेत. वैयक्तिक कारणातून होणारे खून रोखणे पोलिसांच्या हातात नसले, तरी वर्चस्ववाद, टोळीयुद्ध आणि गुन्हेगारीतून होणारे खून रोखण्याचे पोलिस दलासमोर आव्हान उभे राहिले आहे.
नशेखोरीने गुन्हे वाढले
दारू, गांजा, नशेच्या गोळ्यांचा वापर यामुळे गुन्हेगारी वाढत चालली आहे. अनेक गुन्हेगार नशेच्या गोळ्या घेऊन गुन्हा करण्याचे धाडस करतात, असे काही खुनाच्या घटनांवरून दिसून येत आहे. वाढती नशेखोरी आणि गुन्हेगारी असे समीकरण निर्माण झाले आहे. पोलिस कारवाईनंतरही नशेखोरी अद्याप थांबलेली नाही.
सांगलीत महिन्यात पाच खून
सांगलीत दारूच्या नशेत औद्योगिक वसाहत, शंभरफुटी रस्त्यावरील व्हाइट हाउस बार, पोलिस चौकीसमोरील तबेला येथे खून झाले, तसेच सिव्हिल हॉस्पिटलजवळील गारपीर चौकातील दोघांचा खून असे पाच खून झाले आहेत. महिनाभरात पाच जणांचा खून झाल्याने खळबळ उडाली आहे.
सर्रास शस्त्रांचा वापर
गेल्या काही महिन्यांत कोयत्यासारख्या धारदार शस्त्रांचा वापर करून खुनासाठी केला जात आहे. कोयता कोठेही सहजपणे रस्त्यावरही विकला जातो. सहज मिळत असल्यामुळे त्याचा खून करण्यासाठी वापर केला जात आहे, तसेच ऑनलाइन व कोठेही सहज मिळणाऱ्या चाकूचा गुन्ह्यातील वापर धोकादायक ठरत आहे.
गुन्हे प्रकटीकरण शाखेचे दुर्लक्ष
पोलिस ठाणेअंतर्गत स्थापन केलेल्या गुन्हे प्रकटीकरण शाखा (डीबी)ची कारवाई अपवाद वगळता प्रभावी ठरत नाही. केवळ सिव्हिल गणवेशात अनेक पोलिस कर्मचारी हद्दीमध्ये मिरवतात. हद्दीतील गुन्हेगारांच्या कारवायांना वेळीच आवर घालण्यासाठी डीबीने आक्रमक होण्याची गरज आहे.
रेकॉर्डवरील गुन्हेगारांची दहशत
खून, खुनी हल्ला, गंभीर दुखापत अशा गुन्ह्यात सहभाग असलेल्या गुन्हेगारांनी सांगली परिसरात दहशत निर्माण केली आहे. कायद्यातील पळवाटा शोधून गुन्ह्यातील सुटलेल्या मोकाट गुन्हेगारांनी पुन्हा वर्चस्व निर्माण करण्यास सुरुवात केल्याचे काही भागात दिसून येते. पोलिसांचा त्यांच्यावर वचक राहिलेला नाही.
कायद्याचा धाक हवा
गुन्हेगारांना सतत कायद्याच्या कचाट्यात पकडून ठेवणे हाच गुन्हेगारी रोखण्याचा प्रभावी मार्ग असू शकतो. सतत प्रतिबंधात्मक कारवाईखाली गुन्हेगारांना जखडून ठेवल्यास गुन्हेगारी कारवायांना पायबंद बसू शकतो. त्यासाठी ठोस पावले उचलण्याची गरज आहे.