रेल्वेत नोकरीच्या आमिषाने तरुणांना ६० लाखाचा गंडा, सांगलीतील वेजेगावाच्या गलाई व्यावसायिकाला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2022 14:25 IST2022-12-17T14:24:35+5:302022-12-17T14:25:07+5:30
चार तरुणांची फसवणूक करुन उकळले पैसे

रेल्वेत नोकरीच्या आमिषाने तरुणांना ६० लाखाचा गंडा, सांगलीतील वेजेगावाच्या गलाई व्यावसायिकाला अटक
विटा (सांगली) : रेल्वेतील नोकरीच्या आमिषाने खानापूर, आटपाडी, वाळवा तालुक्यांतील चार तरुणांना तब्बल ५८ लाख ७५ हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार शुक्रवारी उघडकीस आला. या प्रकरणी वेजेगाव (ता. खानापूर) येथील बालाजी भीमराव देवकर (वय ६५) या गलाई व्यावसायिकाला अटक करण्यात आली आहे.
वेजेगाव येथील बालाजी देवकर गलाई व्यावसायिक आहे. त्याने रेल्वेमध्ये ग्रुप सी पदाकरिता नोकरी लावण्यासाठी भिकवडी बुद्रुक येथील प्रवीण विलास खुपकर या तरुणास आमिष दाखवले. त्यावेळी त्याने प्रत्येकी १५ लाख रुपये मागितले. रेल्वेत नोकरी मिळणार या आशेपोटी प्रवीण खुपकर यांनी १३ लाख ७५ हजार रुपये ठकसेन देवकर यास दिले.
रेल्वेत नोकरी मिळत असल्याचे खुपकरचे मित्र महावीर विलास पोकळे (रा. जांभुळणी, ता. आटपाडी), महेंद्र चंद्रकांत नलवडे (रा. वलखड, ता. खानापूर) आणि सुनील अर्जुन पवार (रा. किल्ले मच्छिंद्रगड, ता. वाळवा) यांना समजल्यानंतर त्यांनीही देवकर याची भेट घेतली. त्यावेळी देवकर याने त्या तिघांनाही रेल्वेत सी ग्रुपपदी नोकरी लावण्याचे आमिष दाखविले.
देवकरने त्यांच्याकडून प्रत्येकी १५ लाख रुपये घेतले. असे चौघांकडून ५८ लाख ७५ हजार रुपये उकळले. त्यानंतर देवकरने भारतीय रेल्वेचे आणि भारत सरकारचे बनावट शिक्के व बनावट कागदपत्रे तयार करून चौघांना थेट रेल्वे भरतीचे नियुक्तीपत्रही दिले. परंतु नोकरभरतीत फसवणूक झाल्याचे या तरुणांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी याबाबत देवकरला जाब विचारला व पैसे परत देण्याची मागणी केली; पण पैसे परत देण्यास त्याच्याकडून टाळाटाळ केली जात होती. त्यामुळे प्रवीण खुपकर याने विटा पोलिसांत फिर्याद दिली.