Crime News: नोकरीच्या आमिषाने ४४ लाखांचा गंडा, नागठाणेच्या ठकसेनास कर्नाटकात अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2022 14:16 IST2022-08-04T14:15:53+5:302022-08-04T14:16:46+5:30
रेल्वेमध्ये तिकीट तपासणीस, टीटीई, क्लार्कपदी भरती करण्याचे आमिष

Crime News: नोकरीच्या आमिषाने ४४ लाखांचा गंडा, नागठाणेच्या ठकसेनास कर्नाटकात अटक
भिलवडी : रेल्वेमध्ये तिकीट तपासणीस, टीटीई, क्लार्कपदी भरती करण्याचे आमिष दाखवून तरुणांना ४४ लाखांचा गंडा घालणाऱ्या नागठाणे (ता. पलूस) येथील ठकसेन मौलाली शौकत मुल्ला यास भिलवडी पोलिसांनी सापळा रचून इंडी (कर्नाटक) येथे अटक केली.
भिलवडी पोलीस ठाण्यात १ जुलैरोजी किरण महादेव पवार (रा. आरग, ता. मिरज) व त्याच्या मित्रांनी तक्रार दाखल केली होती. भारतीय रेल्वेमध्ये नोकरीचे आमिष दाखवून मौलाली शौकत मुल्ला व शौकत गुलाब मुल्ला यांनी फसवणूक केल्याचे त्यात म्हटले होते. त्यानुसार दोघा बाप-लेकांविरोधात भिलवडी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या तक्रारीवरून भिलवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक कैलास कोडग, एम. एस. मोरे तपास करीत होते. तब्बल एक महिना मुल्ला नागठाणे परिसरातून गायब होता. २९ जुलैरोजी खबऱ्याकडून मौलाली मुल्ला इंडी (जिल्हा विजापूर, राज्य कर्नाटक) येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार भिलवडी पोलिसांच्या पथकाने इंडी येथे जाऊन मौलाली मुल्ला यास शिताफीने पकडले. त्याला अटक केली आहे.
पलूस न्यायालयासमोर त्याला ६ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. त्याने नोकरीचे आमिष दाखवून आणखी कोणाची फसवणूक केली असल्यास पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.