शिराळ्यात ४२ शाळांना अतिवृष्टीचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 17:11 IST2019-11-20T17:10:32+5:302019-11-20T17:11:32+5:30
बाधित शाळांमध्ये प्राथमिकचे २५९७ , माध्यमिकचे ८२१८ असे एकूण १० हजार ८१५ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मुळात या शाळांच्या देखभाल-दुरूस्तीसाठी शासनाने विशेष निधीची तरतूद करून कामे करण्याची गरज आहे.

शिराळ्यात ४२ शाळांना अतिवृष्टीचा फटका
विकास शहा ।
शिराळा : अतिवृष्टीमुळे शिराळा तालुक्यातील ४२ जिल्हा परिषद शाळांचे १ कोटी ९३ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. याबाबत शासनाला प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. शासनाकडून या शाळांच्या दुरूस्तीसाठी आता निधीची गरज असून तो तात्काळ मिळावा, अशी मागणी शिक्षणप्रेमींमधून केली जात आहे.
तालुक्यात यावर्षी अतिवृष्टी व परतीच्या पावसाने मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये प्राथमिक शाळांचेही नुकसान झाले आहे. यामध्ये धनगरवाडी, आरळा, चांदोलीवाडी, बांबरवाडी, कोकनेवाडी, खोतवाडी, किनरेवाडी, कुसलेवाडी, कलुंदे्र, वाकाईवाडी, नाठवडे, चरण, खिरवडे, मानेवाडी (पाचगणी), कुंभवडेवाडी, मेणी, चिंचोली, बिळाशी, विरवाडी, खुंदलापूर वसाहत (बिळाशी), नाटोली, पुनवत, सागाव, मांगले, कांदे, चिखलवाडी, इंग्रुळ, तडवळे, कदमवाडी, पावलेवाडी, शिराळा, औंढी, पाडळेवाडी, अंत्री खुर्द, बादेवाडी, प. त. शिराळा, पाचुंब्री, गिरजवडे, धामवडे, बांबवडे येथील ४२ शाळांच्या खोल्यांची दुरुस्ती, छत दुरुस्ती, संरक्षक भिंत, किचन दुरुस्तीसाठी १ कोटी ९३ लाख ५ हजार रुपये आवश्यक आहेत. त्यादृष्टीने शासनास प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.
बाधित शाळांमध्ये प्राथमिकचे २५९७ , माध्यमिकचे ८२१८ असे एकूण १० हजार ८१५ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मुळात या शाळांच्या देखभाल-दुरूस्तीसाठी शासनाने विशेष निधीची तरतूद करून कामे करण्याची गरज आहे. परंतु शासनकिय पातळीवर याबाबत अद्याप उदासीनता दिसून येत आहे. त्यामुळे या शाळांची दुरूस्ती होणार केव्हा? असा प्रश्न पडला आहे.