सांगली महापालिकेत घोटाळ्यांची मालिका सुरूच; नोकर भरतीच्या नावाखाली आणखी २२ जणांना गंडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 16:01 IST2025-11-10T16:00:46+5:302025-11-10T16:01:03+5:30
नकली नियुक्तीपत्र देऊन लाखो रुपये उकळले

सांगली महापालिकेत घोटाळ्यांची मालिका सुरूच; नोकर भरतीच्या नावाखाली आणखी २२ जणांना गंडा
शीतल पाटील
सांगली : सत्ता कुणाचीही असो, आयुक्त कोणीही असो, महापालिकेत घोटाळ्याची मालिका थांबण्याचे नाव घेईना. बीओटी, वीज बिल, पाणी कनेक्शन अशा एकापाठोपाठ एक प्रकरणांनी महापालिका बदनाम झाली असताना आता बोगस नोकरी भरतीचा नवा घोटाळा उघडकीस आला आहे. आतापर्यंत या प्रकरणात चार ते पाच जणांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. पण फसवणूक होणाऱ्यांचा आकडा वाढण्याची शक्यता असून, प्राथमिक माहितीनुसार २२ ते २३ जणांकडून लाखो रुपये उकळल्याची चर्चा शहरभर आहे.
महापालिकेत दर दोन-चार वर्षांनी एखादा घोटाळा उघडकीस येतो. काही वर्षांपूर्वी वीज बिल घोटाळा उघडकीस आला. यात महापालिकेला कोट्यवधी रुपयांचा चुना लावण्यात आला. त्याची चौकशीही अद्याप पूर्ण झालेली नाही. तत्पूर्वी कोट्यवधी भूखंड वाटप, बीओटीअंतर्गत बांधकामे, जागा खरेदीतून लाखोंचा घोळ, बोगस पाणी कनेक्शन घोटाळा अशी एकापाठोपाठ एक मालिका सुरूच राहिली आहे. त्यात आता बोगस नोकर भरतीच्या प्रकाराने महापालिकेत खळबळ उडाली आहे.
नोकरीचे आमिष आणि लाखोंचा घोटाळा
शहरातील बेरोजगार युवकांना महापालिकेत कायमस्वरुपी नोकरी मिळवून देतो, असे सांगून काहींनी त्यांच्याकडून मोठ्या रकमा उकळल्या. काहींना सफाई कामगार, काहींना लिपिक, तर काहींना कंत्राटी कर्मचाऱ्याच्या नावाने नियुक्तीपत्र देण्यात आले. या पत्रावर आयुक्त, उपायुक्तांच्या स्वाक्षऱ्यासह शिक्के तयार करण्यात आले. त्यामुळे ती खरी असल्याचा भास झाला आणि फसवणुकीच्या जाळ्यात अनेकजण अडकले.
२२ जणांची फसवणूक
महापालिकेचे माजी आयुक्त, उपायुक्तांच्या बनावट स्वाक्षरीने नियुक्तीपत्रे देत बोगस नोकर भरती करण्यात आल्याची तक्रार ॲड. माणिक तेग्गी यांनी आयुक्त सत्यम गांधी यांच्याकडे केली होती. यात एकाने अनुराधा कांबळे यांच्याकडून ५ लाख, सनत कांबळे यांंच्याकडून ८ लाख, आदित्य बनसोडे यांच्याकडून १ लाख ७० हजार, विकी कांबळे यांच्याकडून १ लाख, अशी रक्कम घेतली आहे. हे प्रकरण उजेडात येण्यापूर्वी सनत कांबळे, आदित्य बनसोडे या दोघांना काही रक्कम परत करण्यात आली. या प्रकरणाच्या चौकशीत बोगस नोकर भरतीचा प्रकार समोर आल्याने प्रशासनाला धक्का बसला. केवळ चार ते पाच जणांचीच फसवणूक झाली नसून आणखी २२ ते २३ जणांना गंडा घातल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. त्यातील काहीजण आता समोर येऊन तक्रारही देण्यात तयार झाले आहेत.
एकावर गुन्हा दाखल
महापालिकेत कनिष्ठ लिपिक पदासाठी खोटे नियुक्तीपत्र व बोगस सुरक्षा अनामत रकमेची पावती देऊन दिनेश पुजारी याने खणभाग येथील तरुणाची ३ लाख ४० हजारांची फसवणूक केली असल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी पुजारीवर गुन्हा दाखल करण्यासंदर्भात महापालिकेने सांगली शहर पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला आहे. महापालिकेतील आयुक्तांशी माझे चांगले संबंध असून, भरती प्रकियेतून नियुक्ती करून देतो, असे सांगून पुजारी याने फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्याने नरसोबावाडी आणि तासगाव येथील अन्य दोन व्यक्तींनाही खोटे नियुक्तीपत्र दिले असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, पुजारी याने सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल करून महापालिकेच्या वरिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांवर भरतीबाबत आरोप केल्याने खळबळ उडाली.
उपअभियंता पदावर दिली थेट नियुक्ती
बोगस नोकर भरतीत एका तरुणाला उपअभियंता पदाचे नियुक्तीपत्र देण्यात आले आहे. महापालिकेत अनेक अभियंते ३० ते ३५ वर्षे सेवा बजावून निवृत्त झाले, पण त्यांना उपअभियंता पदावर बढती मिळाली नाही. पण बोगस भरती करणाऱ्या टोळीने आस्थापनेवर क्रमांक दोनच्या पदावरच भरतीचा कारनामा केला.
संशयाची सुई महापालिकेकडेही
या सर्व प्रक्रियेत महापालिकेच्या शिक्का व अधिकाऱ्यांच्या सह्यांचा वापर करण्यात आला. नियुक्तीपत्रावरील फाॅरमॅट, अधिकाऱ्यांच्या नावाचा वापर आणि शिक्क्याची प्रतिकृती पाहता, हा प्रकार बाहेरील व्यक्तीकडून इतक्या सहज शक्य नसल्याची चर्चा आहे. त्यात दिनेश पुजारी या संशयिताने काही अधिकारी व कर्मचाऱ्यांवर आरोप केल्याने संशयाची सुई महापालिकेतही वळली आहे.
घोटाळ्याची फॅक्टरी
बीओटी, वीज बिल, पाणी पुरवठा आणि आता बोगस नोकर भरती, या सलग घोटाळ्यामुळे प्रशासनावरील विश्वास डळमळीत झाला आहे. यातील काही प्रकरणांची चौकशी झाली. पण त्याचा निष्कर्ष सार्वजनिक केला गेला नाही. महापालिका म्हणजे घोटाळ्याची फॅक्टरी बनल्याची टीकाही होऊ लागली आहे.
महापालिकेत सध्या नोकर भरती प्रक्रिया सुरू नाही. नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखविणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला नागरिकांनी बळी पडू नये. महापालिकेच्या सर्व अधिकृत सूचना अधिकृत संकेतस्थळावर किंवा प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिल्या जातात. नागरिकांनी अशा खोट्या आश्वासनांवर विश्वास ठेवण्यापूर्वी प्रशासनाशी संपर्क साधून सत्यता पडताळून पाहावी. - सत्यम गांधी, आयुक्त
महापालिकेतील बोगस नोकरी भरतीचा पर्दापाश झाला आहे. आम्ही चार जणांच्या फसवणुकीची तक्रार केली होती. त्यानंतर आणखी तीन जणांनी फसवणूक झाल्याबाबत संपर्क केला आहे. महापालिकेतील कर्मचाऱ्याच्या सहभागाशिवाय हा घोटाळा होऊ शकत नाही. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून बड्या माशांवर कारवाई करावी. - ॲड. माणिक तेग्गी, सांगली