दुष्काळ भागासाठी संजीवनी ठरणाऱ्या म्हैसाळ योजनेचे आवर्तन सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2022 15:46 IST2022-03-03T15:46:04+5:302022-03-03T15:46:43+5:30
पिकांचे नुकसान होऊ नये म्हणून म्हैसाळ योजना सुरू

दुष्काळ भागासाठी संजीवनी ठरणाऱ्या म्हैसाळ योजनेचे आवर्तन सुरू
सुशांत घोरपडे
म्हैसाळ : दुष्काळ भागाला संजीवनी ठरणाऱ्या म्हैसाळ योजनेचे आवर्तन मोहनराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष व सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक मनोज शिंदे-म्हैसाळकर यांच्या हस्ते बटन दाबून सुरू करण्यात आले. यावेळी यांत्रिक विभागाचे कार्यकारी अभियंता उमेश जाधव प्रमुख उपस्थित होते.
सध्या उन्हाची तीव्रता वाढत चालली असल्याने शेतकऱ्यांच्या शेतातील विहीर, कुपनलिका, तलावांच्या पाणी पातळीत घट होत आहे. परिणामी शेतातील पिके वाळून जात आहेत. पिकांचे नुकसान होऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी म्हैसाळ योजना सुरू करावी अशी मागणी महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे केली होती. शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेऊन मंत्री पाटील यांनी योजना तात्काळ सुरू करण्याचे आदेश दिले.
आदेशानुसार आज दोंन पंप सुरू करण्यात आले असून १२० क्युसेक्स पाण्याचा पुरवठा सुरू आहे. आज सायंकाळी आणखी पाच पंप सुरू करण्यात येणार आहेत अशी माहिती पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
यावेळी मिरज तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष तानाजी दळवी, मिरज तालुका विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष प्रमोद इनामदार, कार्याध्यक्ष गंगाधर तोडकर, युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष शिवाजी महाडिक, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक बाळासाहेब होनमोरे, बोलवाडचे सरपंच सुहास पाटील, नरसिंह संगलगे, पाटंबधारे उपविभागीय अधिकारी एम.के.साळे, शाखा अभियंता एम.डी.करे उपस्थित होते.