दिल्लीत सराफ दुकानात पोलिस असल्याचे सांगून १ कोटी लुटले, सांगलीतील दोघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2025 19:05 IST2025-09-20T19:05:13+5:302025-09-20T19:05:45+5:30
एलसीबी-दिल्ली क्राइम ब्रँचची कारवाई

दिल्लीत सराफ दुकानात पोलिस असल्याचे सांगून १ कोटी लुटले, सांगलीतील दोघांना अटक
सांगली : दिल्ली येथील फर्शबझार परिसरातील भोला ज्वेलर्समध्ये पोलिस असल्याचे सांगून रोकड, दागिने असा १ कोटी ५६ लाखांचा ऐवज घेऊन पसार झालेल्या सांगली जिल्ह्यातील दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि दिल्ली क्राइम ब्रँचच्या पथकाने सोनी, आरग (ता. मिरज) येथे अटक केली. संशयित प्रशांत राजकुमार कदम (वय २५, रा. उपळावी रस्ता, सोनी), शुभम राजाराम कांबळे (वय २६, रा. आरग, मूळ रा. कळंबी, ता. मिरज) या दोघांकडून १४०० ग्रॅम सोन्याचे दागिने व बिस्किटे, तीन किलो चांदी व रोख ११ लाख ९१ हजार रुपये असा एक कोटी ५६ लाख २० हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिल्लीतील फर्शबझार पोलिस ठाणे हद्दीतील छोटा बझारमधील भोला ज्वेलर्सचे मालक विक्रम कुबेरदास काबुगडे (रा. फर्शबझार) हे दि. १५ सप्टेंबर रोजी दुपारी दोनच्या सुमारास जेवायला बाहेर पडल्यानंतर संशयित प्रशांत कदम व शुभम कांबळे हे पोलिस असल्याचे सांगून घुसले. त्यानंतर चार कामगारांना धमकावून रोख २० लाख रुपये, १४०० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, बिस्किटे, तीन किलो चांदी लुटून एका कामगाराचे अपहण केले. सराफ काबुगडे यांना प्रकार समजताच फर्शबझार पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
या घटनेनंतर दिल्ली क्राइम ब्रँचचे पोलिस अधिकारी व कर्मचारी तपास करत होते. तेव्हा दुकानातील कामगारांनी प्रशांत कदम व शुभम कांबळे यांच्या मदतीने जबरी चोरी केल्याचे स्पष्ट झाले. दोघे पळून सांगली जिल्ह्यात आल्याची माहिती मिळाली. त्यांनी सांगली पोलिसांची मदत मागितली. स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक सतीश शिंदे यांनी पथक कार्यरत केले. दिल्ली क्राइम ब्रँचचे पथकही दाखल झाले. गुन्हे अन्वेषणचे पोलिस कर्मचारी सुशील मस्के आणि अभिजित माळकर यांना संशयित दोघे सोनी आणि आरग गावात असल्याची माहिती मिळाली.
पथकाने सोनी येथे प्रशांत कदम याला तर आरग येथे शुभम कांबळे याला ताब्यात घेतले. दोघांच्या चौकशीत जबरी चोरीची कबुली दिली. त्यांच्याकडून रोख ११ लाख ९१ हजार रुपये, १४०० ग्रॅम सोन्याची बिस्किटे, ३ किलो चांदी असा १ कोटी ५६ लाख २० हजारांचा मुद्देमाल दिल्लीचे उपनिरीक्षक अमित चौधरी, सहायक फौजदार शशिकांत यादव यांनी जप्त केला. त्यानंतर दोघांना चार दिवसांची ‘ट्रान्झिट कोठडी’ घेऊन पोलिस दिल्लीकडे रवाना झाले.
गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक कुमार पाटील, संदीप पाटील, अतुल माने, श्रीधर बागडी, संकेत कानडे, ऋतुराज होळकर, पवन सदामते, विनायक सुतार, सुमित सूर्यवंशी, अभिजित पाटील, अजय पाटील, कॅप्टन गुंडवाडे यांच्या पथकाने कारवाईत सहभाग घेतला.
चौघांनी कट रचला
दिल्लीतील काबुगडे यांच्या दुकानात चौघे कामगार होते. त्यापैकी दोघांनी सोनी, आरग येथील प्रशांत, शुभम यांच्या मदतीने चोरीचा कट रचला. त्यानुसार दोघेजण पोलिस असल्याचे भासवून दुकानात घुसले होते. जाताना त्यांनी एकाचे अपहरण केले. अखेर त्यांचा प्लॅन फसला.