Ratnagiri Crime: डॉक्टरकडे जातो म्हणून सांगून गेला, खानवलीतील तरुण पाच दिवसांनी मृतावस्थेत सापडला
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2025 16:42 IST2025-10-11T16:39:59+5:302025-10-11T16:42:19+5:30
मुंबई येथे खासगी नोकरीला हाेता. नवरात्राेत्सवाला आला होता गावी

Ratnagiri Crime: डॉक्टरकडे जातो म्हणून सांगून गेला, खानवलीतील तरुण पाच दिवसांनी मृतावस्थेत सापडला
लांजा : डॉक्टरकडे जातो म्हणून घरी सांगून घराबाहेर पडलेल्या खानवली येथील ३० वर्षीय तरुणाचा तब्बल पाच दिवसांनी शुक्रवारी (दि. १०) रस्त्याच्या गटारात दुचाकीसह मृतावस्थेत सापडला. ईश्वर रवींद्र सुर्वे (रा. खानवली-इवलकरवाडी, लांजा) असे त्याचे नाव आहे.
ईश्वर सुर्वे मुंबई येथे खासगी नोकरीला हाेता. नवरात्राेत्सवाला तो खानवली येथे गावी आला होता. सोमवारी (दि. ६) डाॅक्टरकडे जातो असे सांगून ताे दुचाकी घेऊन सकाळी १० वाजता घरातून बाहेर पडला होता. रात्री उशिरापर्यंत ताे घरी न आल्याने घरच्या मंडळींनी नातेवाइकांकडे चौकशी केली. मात्र, तो त्यांच्याकडे गेलेला नसल्याचे कळले. दुसऱ्या दिवशी सकाळी घरची मंडळी व वाडीतील ग्रामस्थांनी त्यांचा शोध घेतला असता तो कुठेच दिसला नाही. त्याला बाहेर दोन-चार दिवस राहण्याची सवय असल्याने तो मित्राकडे गेला असावा असे घरच्यांना वाटले हाेते.
शुक्रवारी सकाळी सापुचेतळे - खानवली रस्त्यावर वाडीलिंबू साई मंदिराच्या मागे रस्त्याच्या गटारामधून दुर्गंधी येत असल्याचे खानवली येथील ग्रामस्थांच्या लक्षात आले. त्यांनी गवत बाजूला केले असता दुचाकी दिसली. त्याचवेळी ईश्वर याचे वडील याच रस्त्याने जात होते. त्याच्या वडिलांनी धीर करून पाहिले असता त्यांना दुचाकी आपल्या मुलाची असल्याचे लक्षात आले आणि त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली.
याबाबत लांजा पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिस निरीक्षक नीळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक देवकन्या मैदाड, हेडकॉन्स्टेबल राजेंद्र कांबळे, नासिर नावळेकर, जान्हवी मांजरे, वैभवी नारकर, विष्णू मांजरेकर यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. ईश्वर सुर्वे याचा भाऊ वृषल सुर्वे यांनी लांजा पोलिस स्थानकात माहिती दिली. पाेलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. अधिक तपास हेडकॉन्स्टेबल नासिर नावळेकर करीत आहेत.
गवतामुळे ‘तो’ दिसला नाही
एक ते दोन मीटर दुचाकीसह ईश्वर रस्त्यावर फरफटत गटारात जाऊन गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. रस्त्याच्या साइटपट्टीवर उंच गवत असल्याने अपघात होऊनही गटारात पडलेला जखमी ईश्वर कुणालाही न दिसल्याने वेळीच उपचार हाेऊ शकले नाहीत.