भोवऱ्यात अडकल्याने पर्यटनास आलेला तरुण गणपतीपुळेच्या समुद्रात बुडाला
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2021 15:43 IST2021-09-16T15:41:56+5:302021-09-16T15:43:28+5:30
सांगलीतील प्रणेश मुकुंद वसगडेकर (२३), ओंकार उत्तम मेहतर (२८), वैभव जगताप (२४) आणि पृथ्वीराज पाटील हे चार मित्र गुरुवारी सकाळी नॅनो कारने गणपतीपुळेत फिरण्यासाठी आले

भोवऱ्यात अडकल्याने पर्यटनास आलेला तरुण गणपतीपुळेच्या समुद्रात बुडाला
गणपतीपुळे (रत्नागिरी) : पर्यटनासाठी म्हणून सांगलीहून आलेल्या चार तरुणांपैकी दोन तरुण बुडाल्याचा प्रकार गुरूवारी सकाळी घडला. त्यापैकी एकाला लगेचच बाहेर काढण्यात आले. मात्र प्रणेश वसगडेकर या तरुणाला मात्र काही वेळानंतर बाहेर काढण्यात आले. त्यामुळे त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे.
सांगलीतील प्रणेश मुकुंद वसगडेकर (२३), ओंकार उत्तम मेहतर (२८), वैभव जगताप (२४) आणि पृथ्वीराज पाटील हे चार मित्र गुरुवारी सकाळी नॅनो कारने गणपतीपुळेत फिरण्यासाठी आले. स्थानिक लोकांनी त्यांना पाण्यात न जाण्याची सूचना केली. मात्र आपल्याला पोहता येते, असे सांगून प्रणेश आणि त्याचा एक मित्र समुद्रात पोहण्यासाठी गेले. समुद्रातील भोवऱ्यामुळे ते दोघे गटांगळ्या खाऊ लागले. त्यातील एकाला स्थानिक लोकांनी लगेचच बाहेर काढले. प्रणेश हाती लागण्यात मात्र बराच वेळ गेला. ज्यावेळी तो सापडला, तेव्हा तो काहीच हालचाल करत नव्हता. त्याची स्थिती गंभीर असल्याने त्याला मालगुंडच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. तेथून त्याला रत्नागिरी शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे.