Ratnagiri: पावसामुळे परशुराम घाटातील काम ठप्प; लोखंडी जाळी, गॅबियन वॉल उभारणीचे काम रखडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2025 18:36 IST2025-05-24T18:34:48+5:302025-05-24T18:36:02+5:30
गेल्या दोन वर्षांपासून परशुराम घाटातील धोकादायक स्थिती कायम चर्चेत राहिली

Ratnagiri: पावसामुळे परशुराम घाटातील काम ठप्प; लोखंडी जाळी, गॅबियन वॉल उभारणीचे काम रखडले
चिपळूण : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणांतर्गत परशुराम घाटातील धोकादायक दरडीच्या ठिकाणी केल्या जाणाऱ्या सुरक्षिततेच्या उपाययोजनांच्या कामांना गती मिळाली असताना गेले तीन दिवस कोसळत असलेल्या मान्सून पूर्वने ब्रेक लागला आहे. धोकादायक दरडीच्या ठिकाणी सुरू असलेले लोखंडी जाळी ठोकण्याचे काम आणि गॅबियन वॉल उभारणीच्या कामांत गेले तीन दिवस कोसळत असलेल्या पावसाने खोडा घातला आहे. आता पाऊस थांबण्याची प्रतीक्षा लागून राहिली आहे.
गेल्या दोन वर्षांपासून परशुराम घाटातील धोकादायक स्थिती कायम चर्चेत राहिली आहे. या घाटात एका बाजूला २२ मीटर उंचीच्या दरडीचा भाग असल्याने या ठिकाणी पावसाळ्यात नियमित घडणाऱ्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर धोकादायक दरडीच्या ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून लोखंडी जाळी बसवली जात आहे. लोखंडी जाळी बसवण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून पावसाळ्यापूर्वी ते काम पूर्णत्वास जाण्याच्यादृष्टीने प्रयत्न केले जात आहेत.
तर दुसरीकडे गेल्या पावसाळ्यात कोसळलेल्या संरक्षक भिंतीच्या बाजूने गॅबियनवॉल उभारण्याचे कामदेखील वेगाने सुरू केले आहे. सिमेंट काँक्रिटीकरणाचा पाया तयार करून त्यावर जाळीच्या साहाय्याने दगडी बांधकामाची रचना केली जात आहे. पावसाळ्यापूर्वी हे कामही मार्गी लावण्याच्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी आवश्यक ती यंत्रणा येथे कार्यरत केली आहे.
गेल्या तीन दिवसांपासून मान्सूनपूर्व पावसामुळे परशुराम घाटातील कामावर परिणाम झाला आहे. घाट धोकादायक स्थितीत असल्याने साहजिकच तेथील कामे पावसामुळे ठप्प झाली आहेत. पाऊस थांबल्यानंतर पुढील कामांना गती येणार आहे. कोकणात साधारणपणे जूनच्या पहिल्या आठवड्यात पाऊस सुरू होतो. त्यादृष्टीने महामार्ग आणि कंत्राटदार कंपनीने आपल्या कामांचे नियोजन केलेले हाेते. मात्र, पंधरा दिवस अगोदरच अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावल्याने सर्व नियोजन विस्कटले आहे.