रत्नागिरीतील पावणेदोन वर्षांची जलपरी; अवघ्या १० मिनिटांत १०० मीटर अंतर केले पार, ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड‘मध्ये नोंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2025 16:22 IST2025-12-06T16:18:53+5:302025-12-06T16:22:40+5:30
वेदा'ने जलक्रीडा क्षेत्रात एक नवा इतिहास रचला

रत्नागिरीतील पावणेदोन वर्षांची जलपरी; अवघ्या १० मिनिटांत १०० मीटर अंतर केले पार, ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड‘मध्ये नोंद
रत्नागिरी : अवघ्या १ वर्ष ९ महिने वयाच्या वेदा परेश सरफरे या चिमुकलीने सर्वांत कमी वयाची जलतरणपटू म्हणून इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद करून जलक्रीडा क्षेत्रात एक नवा इतिहास रचला आहे. रत्नागिरीतील महेश मिलके यांची विद्यार्थिनी असलेल्या वेदाने १०० मीटर अवघ्या १० मिनिटांत पोहण्याचा विक्रम करत हा किताब मिळविला आहे. रत्नागिरी जिल्ह्यासाठी ही अभिमानास्पद बाब आहे.
रत्नागिरीत लहान मुलांमध्ये जलतरणाची आवड निर्माण करून त्यांना जलतरणाचे धडे देणारे पहिले जलतरण प्रशिक्षक, निवृत्त सैनिक शंकर मिलके यांचे चिरंजीव, राष्ट्रीय जलतरणपटू महेश मिलके यांची वेदा ही विद्यार्थिनी आहे. चिमुकल्या वेदात असलेले जलतरणाचे काैशल्य महेश मिलके यांनी हेरले. त्यामुळे त्यांनी तिला यात पारंगत होण्यासाठी परिश्रम घेतले.
केवळ ११ महिन्यांच्या प्रशिक्षणाने चिमुकली वेदा जलतरणात पारंगत झाली. गेले ११ महिने महेश मिलके आणि त्यांची पत्नी गौरी मिलके या दोघांच्या मार्गदर्शनाखाली वेदाचे प्रशिक्षण झाले.
परिश्रम आणि सातत्यपूर्ण प्रशिक्षणाचाच परिणाम झाल्याने अवघ्या पावणेदोन वर्षांच्या वेदाने इतक्या लहान वयात 'Youngest Swimmer' म्हणून राष्ट्रीय किताबावर आपली मोहोर उमटवली आहे.
वेदा सरफरेची ही ऐतिहासिक नोंद रत्नागिरीच्या क्रीडा नकाशावर एक नवा मैलाचा दगड ठरली आहे आणि इतर चिमुकल्यांसाठी ती नक्कीच प्रेरणास्रोत ठरेल. - महेश मिलके, जलतरण प्रशिक्षक, रत्नागिरी.