Ratnagiri Crime: कामाच्यावेळी प्रेयसीसोबत बोलण्यावरून वाद; मामानेच केला भाच्याचा खून
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2025 14:44 IST2025-08-04T14:43:48+5:302025-08-04T14:44:06+5:30
माेबाइल लाेकेशनवरून घेतला शोध

Ratnagiri Crime: कामाच्यावेळी प्रेयसीसोबत बोलण्यावरून वाद; मामानेच केला भाच्याचा खून
रत्नागिरी : कामाच्या वेळेत प्रेयसीसोबत बोलत राहत असल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून तरुणाच्या छातीत आरी खुपसून मामाने खून केला. ही घटना शनिवारी रत्नागिरीतील मिरकरवाडा येथील खडप मोहल्ला येथे घडली. या प्रकरणी रात्री उशिरा मामाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
यामध्ये प्रिन्स निषाद (वय १९, रा.उत्तर प्रदेश) याचा मृत्यू झाला. निरज तेजप्रताप निषाद (वय २१, रा.सिकतौर, जि.गोरखपूर, उत्तर प्रदेश) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या विरोधात मोबाइल शॉपी मालक सुहेब हिदायत वस्ता (वय ४०, रा.उद्यमनगर, रत्नागिरी) यांनी शहर पोलिस स्थानकात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, मिरकरवाडा येथील खडप मोहल्ला येथे ते मोबाइल शॉपीचे काम सुरू होते. त्यासाठी लागणारे फर्निचर बनवण्याचा ठेका रवि कुमार याला दिले होते. त्याच्याकडे निरज निषाद, मयत प्रिन्स निषाद आणि अनूज चौरसिया हे तिघे कामगार म्हणून कामाला होते.
यातील निरज निषाद हा प्रिन्स निषादचा चुलत मामा होता. शनिवारी दुपारी हे सर्वजण फर्निचरचे काम करत होते. त्यावेळी प्रिन्स हा कामाच्या वेळेत सतत प्रेयसीसाबत फोनवर बोलत असल्याने निरज आणि प्रिन्स यांच्यात वाद झाला. वाद विकोपाला गेल्यावर त्यांच्यात हाणामारी होऊन निरुजने रागाच्या भरात बाजूची आरी प्रिन्सच्या छातीत खुपसली. त्यातच त्याचा मृत्यू झाला.
शनिवारी रात्री उशिरा निरज निषाद विरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम १०३ (१), ३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला रविवारी न्यायालयात हजर केले असता, पाेलिस काेठडी सुनावण्यात आली.
माेबाइल लाेकेशनवरून घेतले ताब्यात
खुनानंतर निरज निषाद याने अनुज चौरसीयाला सोबत घेऊन घटनास्थळावरून पळ काढला होता. दरम्यान, रवि कुमार याने याबाबत शहर पोलिसांना माहिती देताच, त्यांनी दाेघांचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यांच्या मोबाइल लोकेशनद्वारे दोघांनाही रेल्वे स्थानकातून ताब्यात घेतले.