उद्धव ठाकरे यांचा कोकण दौरा शिवसैनिकांना ऊर्जा देणार?, चिपळुणातही होणार जाहीर सभा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2024 05:51 PM2024-02-03T17:51:17+5:302024-02-03T17:51:36+5:30

चिपळूण : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन दिवस कोकण दौऱ्यावर येत असलेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे ...

Uddhav Thackeray will hold a public meeting in Chiplun during his Konkan tour | उद्धव ठाकरे यांचा कोकण दौरा शिवसैनिकांना ऊर्जा देणार?, चिपळुणातही होणार जाहीर सभा

उद्धव ठाकरे यांचा कोकण दौरा शिवसैनिकांना ऊर्जा देणार?, चिपळुणातही होणार जाहीर सभा

चिपळूण : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन दिवस कोकण दौऱ्यावर येत असलेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. या दौऱ्यात ठाकरे काय बोलणार, चिपळूणची जागा आघाडीमध्ये कोणत्या पक्षाला दिली जाणार, विरोधकांवर काय टीका करणार याकडे शिवसैनिकांसह महाविकास आघाडीतही उत्सुकता आहे. पक्षफुटीनंतर पक्षातच राहिलेल्या लोकांचे मनोबल वाढवण्यासाठी हा दौरा यशस्वी ठरणार का, याकडे आघाडीसह युतीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचेही लक्ष लागले आहे.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा कोकण दौरा सुरू झाला असून, रायगड जिल्ह्यानंतर ते सिंधुदुर्गला जाणार आहेत. ४ रोजी सिंधुदुर्ग आणि ५ फेब्रुवारी रोजी ते रत्नागिरी जिल्ह्यात येणार आहेत. या दौऱ्यात ते विधानसभा मतदार संघ निहाय जाहीरसभा घेत पदाधिकारी, कार्यकर्त्यांसमवेत संवाद बैठका घेणार आहेत. पहिल्या टप्प्यात रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर, रत्नागिरी व चिपळुण मतदार संघात ते ५ रोजी सभाा घेणार आहेत.

५ फेब्रुवारी रोजी उद्धव ठाकरे हे बारसू, राजापूर, रत्नागिरी, देवरुख, चिपळूण या ठिकाणचा दौरा करणार आहेत. शिवसेनेत उभी फूट पडली त्याचे पडसाद कोकणातही उमटले. रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे जिल्हे अनेक वर्षे शिवसेनेचा बालेकिल्ला आहेत. या दोन जिल्ह्यातील तीन आमदारांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळे बालेकिल्ल्यातही उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला. त्यानंतर आता प्रथमच उद्धव ठाकरे कोकणाच्या दौऱ्यावर येत आहेत.

सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन्ही जिल्ह्यातील काही विधानसभा मतदारसंघात त्यांचे संवाद बैठका होणार असून त्याची जय्यत तयारी शिवसैनिक करत आहेत. या दौऱ्याबाबत शिवसैनिकांमध्ये कमालीचा उत्साह दिसून येत आहे.

लोकसभा व विधानसभा निवडणुकीतील उमेदवारीवरून आतापासूनच इच्छुकांमध्ये मोठी चढाओढ सुरू आहे. लोकसभेसाठी महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असणार, त्यासाठी जिल्ह्यातील बड्या नेत्याचा पक्ष प्रवेश होणार का,  खासदार विनायक राऊत यांनाच पुन्हा संधी मिळणार का, यावरूनही खलबते सुरू आहेत. याबाबत उद्धव ठाकरे आपल्या दौऱ्यात काय बोलतात याकडेही सर्वांचे लक्ष वेधले आहे. दरम्यान, आमदार राजन साळवी यांच्यावर झालेल्या कारवाईबाबात ठाकरे महायुतीच्या सरकारवर टीका करण्याची शक्यता असल्याने त्याकडेही कार्यकर्त्यांचे लक्ष आहे.

चिपळूणसाठी अनेक इच्छुक

विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारीबाबत महाविकास आघाडीमध्ये मोठी स्पर्धा आहे. आघाडीतील तीनही पक्षांनी चिपळूण विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे. प्रशांत यादव यांनी नुकताच राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे आणि त्यांच्या नावाची उमेदवार म्हणून घोषणाही पक्षाने केली अहे. ठाकरे शिवसेनेतही अनेक इच्छुक आहेत. त्याबाबत उद्धव ठाकरे काय भाष्य करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

जिल्हा संपर्कप्रमुख पद बराच काळ रिक्त

 ठाकरे गटाचे जिल्हा संपर्कप्रमुख पद सुधीर मोरे यांच्या निधनानंतर कित्येक महिने रिक्त आहे. मातोश्री वरून निघणारे आदेश, पक्षाचे कार्यक्रम, पक्षाची धोरणे स्थानिक पातळीवर जिल्ह्यात आणि तालुक्यात पोहचवण्याचे अत्यंत महत्वाची जबाबदारी संपर्कप्रमुखांकडे असते.

निवडणुकांमध्ये त्यांची जबाबदारी फार महत्वाची ठरते, आता लोकसभा निवडणुका तोंडावर आलेले असताना हे पद रिक्त आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यात रत्नागिरी जिल्हा संपर्क प्रमुख पदाच्या नावाची घोषणा करणार का, याकडे देखील शिवसैनिकांचे लक्ष लागले आहे.

  • उद्धव ठाकरे यांचा कोकण दौरा रायगडपासून सुरू
  • रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात विधानसभा मतदार संघनिहाय भेटी.
  • जाहीर सभांसह पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी संवाद.
  • पक्षफुटीनंतर ठाकरे यांचा पहिलाच दौरा असल्याने ठाकरे शिवसेनेसह विरोधकांमध्येही उत्सुकता

Web Title: Uddhav Thackeray will hold a public meeting in Chiplun during his Konkan tour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.