uddhav thackeray : 'केंद्राकडूनही मदत मिळतेय, पंतप्रधान अन् गृहमंत्र्यांसोबत माझं बोलणं झालंय'
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2021 15:48 IST2021-07-25T15:47:18+5:302021-07-25T15:48:05+5:30
uddhav thackeray : महापुरात उध्वस्त झालेल्या चिपळूणची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री आज आले होते. रत्नागिरी गॅस प्रकल्पाच्या हेलिपॅडवर उतरुन ते चिपळूणला दोन दोन ठिकाणी पाहणी करुन आढावा बैठकीसाठी जात होते

uddhav thackeray : 'केंद्राकडूनही मदत मिळतेय, पंतप्रधान अन् गृहमंत्र्यांसोबत माझं बोलणं झालंय'
रत्नागिरी/चिपळूण - राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पूरग्रस्त चिपळूण भागाला आज भेट दिली. येथील महापूरात आर्थिकदृष्ट्या उध्वस्त झालेल्या वापाऱ्यांच्या समस्या त्यांनी ऐकून घेतल्या. आपलं काय नुकसान झालंय ते आपण पाहिले आहे. आपण चिपळूण पुन्हा उभे करुन दाखवू, असा दिलासा मुख्यमंत्र्यांनी येथील व्यापाऱ्यांना दिला. यावेळी, व्यापाऱ्यांनी तीव्र शब्दात मुख्यमंत्र्यांसमोर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. आता, तुमच्याचकडून आम्हाला अपेक्षा आहेत, तुम्हीचं आमचे मायाबाप आहात, अशा शब्दात अनेकांनी मागणी केली. यावेळी, केंद्राकडूनही मदत मिळत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
महापुरात उध्वस्त झालेल्या चिपळूणची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री आज आले होते. रत्नागिरी गॅस प्रकल्पाच्या हेलिपॅडवर उतरुन ते चिपळूणला दोन दोन ठिकाणी पाहणी करुन आढावा बैठकीसाठी जात होते. मात्र, वाटेतच पानगल्ली येथे जमलेल्या व्यापाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना थांबवले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना तेथे थांबून त्यांचे म्हणणे ऐकून घ्यावे लागले. यावेळी व्यापाऱ्यांनी आपल्या भावना तीव्र शब्दात मांडल्या. पाणी आयत्यावेळी सोडण्यात आल्याने कमी वेळातच पुराचे प्रमाण वाढले. संबंधित अशा लोकांवर कारवाई व्हावी, ही मागणी व्यापाऱ्यांनी केली. त्यास, मुख्यमंत्र्यांनी सहमती दर्शवली असून चिपळूण पुन्हा उभे करण्याचा विश्वास व्यापाऱ्यांना दिला आहे.
‘तुम्हाला पायावर उभं करण्यासाठी सरकार तुमच्या पाठीशी आहे’, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी चिपळूनमधील व्यावसायिक व दुकानदारांना धीर दिला. pic.twitter.com/raLgh5Qt21
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) July 25, 2021
केंद्राकडून मिळतेय मदत, पंतप्रधानांशी झालं बोलणं
केवळ सवंग लोकप्रियता मिळवण्यासाठी मी लगेच काहीतरी घोषणा करणार नाही. राज्यातील पूर परिस्थितीचा सर्वंकष आढावा घेऊनच नुकसानभरपाई संदर्भात घोषणा करण्यात येईल. मदत करताना तांत्रिक मुद्द्यांवर अडचणी येऊ नयेत या संदर्भातील सूचना देखील मी प्रशासनाला केल्या आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच, केंद्राकडूनदेखील काय आणि किती मदत मागायची ते ठरवता येईल. केंद्र सरकारकडून आपणास व्यवस्थित मदत मिळत आहे. माझे पंतप्रधान, गृहमंत्री आणि संरक्षण मंत्री यांच्याशी बोलणं झालं आहे. एनडीआरएफ, लष्कर, हवाई दल यांच्या तुकड्या राज्य सरकारला पूर परिस्थितीत मदत करत आहेत, असेही त्यांनी सांगितले.