Ratnagiri: अल्पवयीन मुलीचा विनयभंग; लोटेतील कोकरे महाराजासह दोघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 16:48 IST2025-10-15T16:46:58+5:302025-10-15T16:48:02+5:30
दोन दिवसांची पोलिस कोठडी

Ratnagiri: अल्पवयीन मुलीचा विनयभंग; लोटेतील कोकरे महाराजासह दोघांना अटक
खेड : तालुक्यातील लोटे येथील श्री संत ज्ञानेश्वर माउली जीवन मुक्तिधाम सेवा संस्था संचालित गोशाळेचे सर्वेसर्वा ह.भ.प. भगवान कोकरे महाराज व त्यांचे साथीदार प्रीतेश प्रभाकर कदम यांना अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी मंगळवारी अटक करण्यात आली. ही घटना २१ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत घडली आहे. या प्रकरणी दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून, दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
पोलिसांकडे दाखल झालेल्या गुन्ह्यानुसार मागील काही काळापासून भगवान कोकरे यांनी अनेकदा या पीडित मुलीशी अश्लील वर्तन केले. तिच्या मनात लज्जा निर्माण होईल, असे कृत्य करून तिचा विनयभंग केला.
सुरुवातीला ही घटना घडल्यानंतर पीडितेने गुरुकुलातीलच एका सदस्याला घटना सांगितली. त्याने याबाबत कुठे काही बोलू नकोस, महाराजांची सामाजिक व राजकीय ओळख आहे, असे धमकावत गप्प राहण्यास सांगितले तसेच जर कोणाला काही सांगितले तर कुटुंबात आणि समाजात तुझी बदनामी होईल, असेही तिला सांगितल्याचे पीडितेने तक्रारीत नमूद केले आहे.
पीडितेच्या बाबतीत वारंवार अशा प्रकारच्या घटना घडू लागल्या आणि अखेर हा सर्व प्रकार तिच्या कुटुंबातील सदस्यांना समजला. कुटुंबीयांनी पोलिस स्थानकात धाव घेतली व यासंदर्भात तक्रार नोंदवली. पोलिसांनी दोघा संशयितांविरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत कलम १२ व १७ आणि भारतीय न्याय संहिता कलम ७४, ३५१ (३), ८५ नुसार गुन्हा नोंदवला आहे. मंगळवारीच भगवान कोकरे आणि प्रीतेश कदम या दोघांना अटक करण्यात आली. न्यायालयाने त्यांना दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
तपासाला गती
खेडचे उपविभागीय पोलिस अधिकारी शशांक सणस व पोलिस निरीक्षक विवेक आहिरे यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. हे प्रकरण संवेदनशील असल्याने पोलिस अधिक गांभीर्याने तपास करीत आहेत.