चिपळुणातील 'फायरिंग' प्रकरणी दोघांना अटक, बंदूकीची गोळी खिडकीची काच फोडून घुसली होती घरात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2025 17:45 IST2025-07-07T17:45:11+5:302025-07-07T17:45:40+5:30

दोघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी

Two arrested in Chiplun firing case, gunshot entered house by breaking window glass | चिपळुणातील 'फायरिंग' प्रकरणी दोघांना अटक, बंदूकीची गोळी खिडकीची काच फोडून घुसली होती घरात 

चिपळुणातील 'फायरिंग' प्रकरणी दोघांना अटक, बंदूकीची गोळी खिडकीची काच फोडून घुसली होती घरात 

चिपळूण : बंदूकीची गोळी थेट खिडकीची काच फोडून स्वंयपाक घरात घुसल्याची घटना शहरातील गोवळकोट रोड हायलाईफ या इमारतीत काही दिवसापूर्वी घडली होती. पोलिसांच्या टॉअसनंतर याप्रकरणी दोघांना येथील पोलिसांनी अटक केली आहे. विशाल विजय पवार (वय-३६, पेठमाप), नितिन धोंडू होळकर (३०, कोंढे) अशी अटक केलेल्याची नावे आहेत.  विनापरवाना बंदूकीतून डुकराच्या शिकारासाठी ही गोळी झाडल्याचे पुढे आले आहे. पोलिसांनी ही बंदूक देखील जप्त केली आहे. न्यायालयाने सोमवारी त्या दोघांना न्यायालयीन कोठडी सुनावली.  

शहरातील गोवाळकोट रोड ठिकाणी हायलाईफ ही तीन मजली इमारत असून त्यामध्ये पहिल्या मजल्यावर अशरफ तांबे यांची सदानिका आहे. २९ जून रोजी सकाळी ११ वाजण्याच्या त्यांच्या सदानिकेच्या स्वंयपाक खोलीमध्ये मोठा आवाज झाला. यावेळी त्याठिकाणी पाहिले असता एक बंदूकीची गोळी खिडकीची काच फोडून थेट स्वंयपाक घरात घुसलेली होती. भर दिवसा झालेल्या खळबळजनक प्रकारानंतर परिसरात मोठी खळबळ उडली होती. याप्रकरणी चिपळूण पोलीस स्थानकात अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

चिपळूण पोलीसांकडून याबाबतचा तपास सुरु असताना अशातच ही बंदूकीची गोळी शिकारीच्या उद्देशाने झाडल्याची माहिती पुढे आली होती. हाच धागा पकडून पोलिसांनी त्या अज्ञाताच्या शोधासाठी तपास गतीमान केला. असे असताना पोलिसांनी गोपनिय माहितीच्या आधारे या गोळीबार प्रकरणी विशाल पवार, नितिन होळकर या दोघांना ताब्यात घेत अटक केली आहे.

पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता विशाल पवार याची हायलाईफ या इमारतीच्या बाजूला भातशेती आहे. त्याठिकाणी डुकराचा वावर असल्याने त्यांच्या शिकारासाठी त्याने नितिन होळकर याला बोलावले होते. नितिन हा विनापरवाना बंदूक घेऊन त्या ठिकाणी आला व त्यांने शिकारीच्या उद्देशाने सिंगल बोअरच्या बंदूकीतून गोळी झाडली. यावेळी त्या बंदूकीतून सुटलेल्या गोळीचा नेम चुकल्याने ती गोळी थेट अशरफ तांबे यांच्या सदानिकेची खिडकीची काच फोडून स्वंयपाक घरात घुसली असल्याचे स्पष्ट झाले आहे. यावेळी गोळीबार केलेली बंदूक देखील पोलीसांनी जप्त केली आहे. 

अटक केलेल्या विशाल पवार, नितिन होळकर याला सोमवारी न्यायालयात हजर केले करण्यात आले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक ओम आघाव, पोलीस हेडकॉन्स्टेबल वृशाल शेटकर, संदीप माणके, प्रितेश शिंदे, रोशन पवार, रुपेश जोगी आदींच्या पथकाने केली.

Web Title: Two arrested in Chiplun firing case, gunshot entered house by breaking window glass

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.