‘टीडब्ल्यूजे’ फसवणुकीतील नार्वेकर दाम्पत्य चिपळूण पोलिसांच्या ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2026 16:44 IST2026-03-16T16:44:26+5:302026-03-16T16:44:54+5:30
कार्यालयातील कागदपत्रे ताब्यात

‘टीडब्ल्यूजे’ फसवणुकीतील नार्वेकर दाम्पत्य चिपळूण पोलिसांच्या ताब्यात
चिपळूण (जि. रत्नागिरी) : गुंतवणूकदारांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या टीडब्ल्यूजे कंपनीचा मुख्य व्यवस्थापक समीर सुभाष नार्वेकर आणि संचालक नेहा समीर नार्वेकर या दाम्पत्याला शनिवारी (दि. १५) रत्नागिरीच्या आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली. या दोघांना चिपळुणातील न्यायालयात हजर केले असता १० दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
भरघोस परताव्याचे आमिष दाखवणाऱ्या टीडब्ल्यूजेमध्ये अनेक गुंतवणूकदारांनी लाखोंच्या पटीत रकमा गुंतविल्या आहेत. मात्र, भरपूर ‘माया’ जमविल्यानंतर काही महिन्यांनी नार्वेकर दाम्पत्याने गुंतवणूकदारांना आर्थिक गंडा घालून पाेबारा केला. याप्रकरणी व्यावसायिक प्रतीक माटे यांनी फसवणूक केल्याची फिर्याद दिली हाेती.
या फिर्यादीनुसार नार्वेकर दाम्पत्यासह कंपनीच्या दोन प्रतिनिधींवर चिपळूण पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पाेलिसांनी नार्वेकर दाम्पत्याला अटक केली असून, त्यांना पाेलिस काेठडी सुनावण्यात आली आहे.
कार्यालयातील कागदपत्रे ताब्यात
टीडब्ल्यूजे कंपनीचे शहरातील बायपास मार्गावर आलिशान कार्यालय होते. फसवणुकीचा प्रकार उघड होताच हे कार्यालय बंद झाले. पाेलिस स्थानकात गुन्हा दाखल होताच रत्नागिरीच्या आर्थिक गुन्हे शाखेने या कार्यालयाची तपासणी करून काही कागदपत्रेही ताब्यात घेतली आहेत.