मुंबई-गोवा महामार्गावरुन प्रवास करणाऱ्यांसाठी खुशखबर, कशेडी बोगदा वाहतुकीसाठी खुला
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2024 12:04 IST2024-11-30T12:04:01+5:302024-11-30T12:04:28+5:30
खेड (जि. रत्नागिरी ) : मुंबई -गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील बोगद्यालगत भोगाव हद्दीत पुलावर गर्डर टाकण्याचे काम पूर्ण झाल्याने ...

मुंबई-गोवा महामार्गावरुन प्रवास करणाऱ्यांसाठी खुशखबर, कशेडी बोगदा वाहतुकीसाठी खुला
खेड (जि. रत्नागिरी) : मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील बोगद्यालगत भोगाव हद्दीत पुलावर गर्डर टाकण्याचे काम पूर्ण झाल्याने बोगदा पुन्हा सुरू करण्यात आला आहे. गत सप्ताहात पुलाच्या कामामुळे हा बोगदा बंद करण्यात आला होता.
कशेडी बोगदा मार्गे जाणाऱ्या नवीन मार्गावर गर्डर टाकण्याचे काम सुरू असल्याने वाहतूक जुन्या मार्गावरून कशेडी बंगलामार्गे वळविण्यात आली होती. मात्र, या मार्गावरील पुलाचे गर्डर टाकण्याचे काम पूर्ण झाल्याने कशेडी बोगदा सर्व वाहनांसाठी खुला करण्यात आला असल्याची माहिती कशेडी महामार्ग पोलिस मदत केंद्राचे हेड कॉन्स्टेबल शंकर कुंभार व रामागडे यांनी दिली आहे.
बोगदा सुरू झाल्यामुळे वाहनचालक सुखावले असले तरी कशेडी बंगला पंचक्रोशीतील ग्रामस्थांची मात्र ओढाताण होत आहे. कशेडी बोगद्यातून एसटीसह ट्रक, टेम्पो, कारसह अवजड वाहनांची वाहतूक सुरू करण्यात आली आहे. या वाहतुकीमुळे वेळेसह इंधनाची बचत होत असल्याने सर्वच वाहनचालक या मार्गाने जाणे पसंत करतात. त्यामुळे जुन्या महामार्गावरील रहदारी कमी झाली आहे.
जुन्या मार्गावरील कशेडी बंगला पंचक्रोशी येथील स्थानिक नागरिक व प्रवाशांना जाण्या-येण्यासाठी वाहने मिळत नसल्याने या विभागातील प्रवाशांकडून नाराजीचा सूर उमटत आहे. किमान चिपळूण, खेड व महाड आगारातील एसटी बसेस या कशेडी बंगला मार्गे सोडण्यात याव्या, अशी मागणी या विभागातील नागरिकांकडून केली जात आहे.