काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदासाठी रस्सीखेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:36 IST2021-08-24T04:36:27+5:302021-08-24T04:36:27+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क लांजा : काँग्रेसच्या रत्नागिरी जिल्हाध्यक्ष पदासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली असून, दिग्गज नेते या पदासाठी ...

The tug of war for the post of Congress district president | काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदासाठी रस्सीखेच

काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदासाठी रस्सीखेच

लोकमत न्यूज नेटवर्क

लांजा : काँग्रेसच्या रत्नागिरी जिल्हाध्यक्ष पदासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली असून, दिग्गज नेते या पदासाठी प्रबळ दावेदार म्हणून स्पर्धेत पुढे आले आहेत.

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. विजय भोसले यांचे निधन झाल्याने हे पद रिक्त आहे. त्याबाबत काँग्रेसच्या वरिष्ठ पातळीवरून अजून कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. सध्या या पदासाठी अनेकांनी दावा केला आहे. यामध्ये प्रशांत यादव (चिपळूण), माजी जिल्हाध्यक्ष रमेश कीर, माजी आमदार हुस्नबानू खलिफे, ॲड. सदानंद गांगण (लांजा), अशोक जाधव (संगमेश्वर), अविनाश लाड (साखरपा), सुरेश कातकर (चिपळूण), सुधीर शिंदे (चिपळूण) यांचा समावेश आहे. या साऱ्यांनी आपण या पदासाठी इच्छुक असल्याचे पक्षाला कळवले आहे, अशी माहिती पुढे येत आहे.

इच्छुकांनी आपापल्या पद्धतीने वरिष्ठांकडे दावे करण्यास सुरुवात केली आहे. त्यातही माजी आमदार हुस्नबानू खलिफे, माजी जिल्हाध्यक्ष रमेश कीर व अविनाश लाड यांच्यापैकी एका नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता अधिक आहे, अशी चर्चा काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे.

Web Title: The tug of war for the post of Congress district president