कोल्हापुरातील पर्यटकांनी समुद्रकिनारी बेफिकिरीने गाडी वाळूवर नेली, भरतीमुळे पाण्यात अडकून पडली
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 15:51 IST2025-12-10T15:51:07+5:302025-12-10T15:51:44+5:30
अखेर तासाभराच्या प्रतीक्षेनंतर त्यांनी पोलिसांना बोलावले आणि त्यानंतर जेसीबीच्या साहाय्याने गाडी बाहेर काढण्यात आली

कोल्हापुरातील पर्यटकांनी समुद्रकिनारी बेफिकिरीने गाडी वाळूवर नेली, भरतीमुळे पाण्यात अडकून पडली
शृंगारतळी : वाहन वाळूमध्ये नेण्यास सक्त मनाई असतानाही कोल्हापूर येथील पर्यटकांनी रविवारी गुहागर समुद्रकिनारी आपली स्कॉर्पिओ थेट वाळूवर नेली. मात्र, भरतीच्या पाण्यामध्ये गाडी अडकून पडली. अखेर तासाभराच्या प्रतीक्षेनंतर त्यांनी पोलिसांना बोलावले आणि त्यानंतर जेसीबीच्या साहाय्याने गाडी बाहेर काढण्यात आली. रविवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. यात गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
गुहागरचा समुद्रकिनारा सुमारे सहा किलोमीटर लांबीचा असून, येथे येणाऱ्या पर्यटकांना वारंवार सूचना देऊनही काही जण नियमांकडे दुर्लक्ष करतात. रविवारी कोल्हापूर येथून गुहागरला फिरण्यासाठी आलेल्या दोन तरुणांनी गुहागर - वरचापाट - पिंपळादेवी मार्गाने आपली स्कॉर्पिओ सिमेंटच्या रॅम्पवरून थेट समुद्रकिनाऱ्यावरील वाळूत नेली. त्याच वेळी भरतीचा जोर वाढल्याने काही क्षणांतच गाडी पाण्यात अडकली.
भरती ओसरल्यानंतर वाहन काढता येईल या अपेक्षेने या तरुणांनी रात्री नऊ वाजेपर्यंत वाट पाहिली. मात्र, पाण्याची पातळी अधिक वाढू लागल्याने अखेर त्यांनी आपत्कालीन मदत क्रमांक ११२ वर संपर्क साधला. साडेनऊ वाजण्याच्या सुमारास गुहागर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. जेसीबीच्या मदतीने तसेच स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने स्कॉर्पिओ पाण्याबाहेर काढण्यात आली.
मनाई असतानाही समुद्रकिनाऱ्यावर वाहन नेत जीव व मालमत्तेला धोका निर्माण केल्याप्रकरणी संबंधित तरुणांवर कोणती कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आधीही दोन गुन्हे
समुद्रकिनाऱ्यावर पर्यटक फिरत असतात. त्यांच्यासोबत लहान मुलेही असतात. त्यामुळे वाळूवर गाड्या नेण्यास पोलिसांनी मनाई केली आहे. तसे फलकही लावण्यात आले आहेत. याआधी दापोली तालुक्यातील हर्णै, मुरुड येथे अशा बेफिकीर वाहनचालकांवर गुन्हे दाखल झाले आहेत. मात्र, अजूनही अनेक पर्यटकांनी त्यातून बोध घेतलेला नाही.