रत्नागिरी जिल्ह्यात पर्यटकांची गर्दी, दोन दिवसांत एक लाख पर्यटकांनी घेतले ‘श्रीं’चे दर्शन
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2026 12:25 IST2026-01-27T12:23:23+5:302026-01-27T12:25:39+5:30
समुद्रकिनाऱ्यांवरील छोट्यामोठ्या व्यवसायांना पर्यटकांमुळे सुगीचे दिवस

रत्नागिरी जिल्ह्यात पर्यटकांची गर्दी, दोन दिवसांत एक लाख पर्यटकांनी घेतले ‘श्रीं’चे दर्शन
रत्नागिरी : वीकेंड व प्रजासत्ताक दिनाची जोडून सुट्टी आल्यामुळे जिल्ह्यात पर्यटकांची गर्दी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. गणपतीपुळे येथे तर ‘श्रीं’च्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागत आहेत. गेल्या दोन दिवसांत एक लाख भाविकांनी ‘श्रीं’चे दर्शन घेतले.
नाताळ व थर्टी फर्स्टमुळे पर्यटक मोठ्या प्रमाणावर जिल्ह्यात आले होते, त्यानंतर पर्यटकांचा ओघ कमी झाला होता. मात्र जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात वीकेंड व प्रजासत्ताक दिनाची जोडून तीन दिवस सुट्टी असल्यामुळे आणि त्यातच माघी गणेशोत्सव सुरू असल्याने जिल्ह्यात पुन्हा एकदा पर्यटक मोठ्या प्रमाणावर आले आहेत. रत्नागिरी तालुक्यात जयगड, गणपतीपुळे, मालगुंड, नेवरे, ढोकमळे, आरेवारे, रत्नागिरी, पावस, पूर्णगड या भागात पर्यटकांची संख्या वाढली आहे.
जिल्ह्यात येणारे पर्यटक प्राधान्याने दापोली, गुहागर, रत्नागिरी तालुक्यातील प्रेक्षणीयस्थळांना भेट देत आहेत. पर्यटकांसाठी समुद्रकिनाऱ्यांचे खास आकर्षण असल्यामुळे पर्यटक समुद्रकिनाऱ्यावर गर्दी करत आहेत. आरेवारे येथे तर सकाळ, संध्याकाळ पर्यटकांची गर्दी होत असल्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागत आहेत. सोमवार संध्याकाळपर्यंत ही गर्दी कायम राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. वाॅटर स्पोर्टस्, स्कुबा डायव्हिंग, झीपलाइन, ऊंट, घोडा, बैलगाडी सवारीचा पर्यटक आनंद घेत आहेत. विशेष म्हणजे कोकणी खाद्यपदार्थ, नारळपाणी यांचा खप वाढला आहे. समुद्रकिनाऱ्यांवरील छोट्यामोठ्या व्यवसायांना पर्यटकांमुळे सुगीचे दिवस आले आहेत.
मुंबई-गोवा महामार्गाचे काम सुरू असल्याने मुख्य मार्गाने येणाऱ्या प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. एसटी, खासगी बसेस, कार, टेम्पो ट्रॅव्हलरशिवाय दुचाकीवरून येणाऱ्या रायडर्सची संख्या वाढली आहे. काही पर्यटक जयगडमार्गे गुहागर तर काही पर्यटक पावस, पूर्णगडमार्गे सिंधुदुर्ग, गोवा गाठत आहेत. फुणगुस भातगावमार्गे संगमेश्वर या पर्यायी मार्गाचा वापर फायदेशीर ठरत आहे.
गर्दीमुळे पोलिस बंदोबस्त
जिल्ह्यात पर्यटकांची गर्दी वाढली असल्यामुळे समुद्रकिनारे, प्रेक्षणीय तसेच धार्मिकस्थळी संरक्षणासाठी पोलिस बंदोबस्तात वाढ झाली आहे. समुद्रात आंघोळीसाठी जाणाऱ्या पर्यटकांना खबरदारीचे आवाहन करण्यात येत आहे.
दापोली, गुहागरातही पर्यटकांची गर्दी
दापोली, गुहागर तालुक्यातही पर्यटकांची गर्दी वाढली आहे. दोन्ही तालुक्यातील समुद्रकिनाऱ्यालगतच्या गावातून पर्यटकांची संख्या वाढली आहे. अनेक पर्यटक दापोली, गुहागर करून गणतीपुळे, रत्नागिरीत येत आहेत.
लाखो भाविकांची गर्दी
श्री क्षेत्र गणपतीपुळे येथे शनिवारी ४३ हजार तर रविवारी ५५ हजार भाविकांनी श्रींचे दर्शन घेतले. सोमवारीसुद्धा सुट्टी असल्यामुळे पर्यटकांची गर्दी कायम राहणार आहे. गणपतीपुळेसह आसपासच्या मालगुंड, नेवरे, ढोकमळे, आरेवारे परिसरातही पर्यटक मुक्कामासाठी थांबत आहेत.