चांदोलीत सोडली, चिपळुणात आढळली; नांदिवसेच्या डोंगरकपारीत ‘हिरकणी’ची डरकाळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2026 18:20 IST2026-02-14T18:20:23+5:302026-02-14T18:20:46+5:30

चिपळूण वनविभाग सतर्क

Tigress Hirkani released in Koyna Sanctuary is roaming the forests above Chiplun | चांदोलीत सोडली, चिपळुणात आढळली; नांदिवसेच्या डोंगरकपारीत ‘हिरकणी’ची डरकाळी

चांदोलीत सोडली, चिपळुणात आढळली; नांदिवसेच्या डोंगरकपारीत ‘हिरकणी’ची डरकाळी

चिपळूण : कोयना अभयारण्य येथील मध्यवर्ती सुरक्षित जंगलात नुकतीच सोडण्यात आलेली ‘हिरकणी’ (एसटीआर ०६) वाघीण आता चिपळूणच्या माथ्यावरील जंगलांच्या दिशेने प्रवास करत असून, तिच्या हालचाली नांदिवसे परिसरातील डोंगरकपारीत आढळून आल्या आहेत. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प मॉनिटरिंग सेंटरकडून प्राप्त झालेल्या जीपीएस सिग्नलनंतर चिपळूण वन विभाग तातडीने सतर्क झाला आहे.

वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी सायंकाळी नांदिवसे गावाला भेट देत ग्रामस्थांशी संवाद साधला आणि खबरदारीच्या सूचना दिल्या. डोंगराळ भागात एकटे जाणे टाळावे, गुरेढोरे सुरक्षित ठिकाणी बांधावीत, तसेच रात्री विशेष दक्षता बाळगावी, असे आवाहन करण्यात आले. पेंच व्याघ्र प्रकल्पांतर्गत नागलवाडी परिक्षेत्रात ५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास एसटीआर ०६ या वाघिणीला पकडण्यात आले. पशुवैद्यकीय तपासणीनंतर ६ फेब्रुवारीला तिला सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आणण्यात आले आणि ७ फेब्रुवारी रोजी सकाळी सहा वाजता कोयना अभयारण्यातील सुरक्षित क्षेत्रात सोडण्यात आले. त्यानंतर ‘हिरकणी’चा ऐतिहासिक मुक्त संचार सुरू झाला.

यापूर्वी एसटीआर ०३ हा ‘बाजी’ नर वाघ, तसेच ‘तारा’ आणि ‘चंदा’ या वाघिणी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात दाखल आहेत. आता ‘हिरकणी’च्या समावेशामुळे प्रजननवृद्धीला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. सातारा, सांगली आणि कोल्हापूर या तीन जिल्ह्यांत सुमारे १,१६५ चौरस किलोमीटरचा सह्याद्री व्याघ्र प्रकल्प जैवविविधतेने समृद्ध आणि अनेक दुर्मीळ प्रजातींचे अधिवास असलेला महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या परिसरात वाघांचे संवर्धन आणि नैसर्गिक अधिवास मजबूत करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत.

‘हिरकणी’च्या नांदिवसे परिसरातील एन्ट्रीमुळे ग्रामस्थांमध्ये उत्सुकता आणि कुतूहलाचे वातावरण निर्माण झाले आहे. वन विभागाच्या तत्परतेमुळे नागरिकांमध्ये विश्वास निर्माण झाला असून, पुढील काही दिवस या परिसरावर बारकाईने नजर ठेवली जाणार आहे.

ग्रामस्थांना सूचना; अफवांपासून दूर राहण्याचे आवाहन

‘हिरकणी’चा वावर पूर्णपणे नैसर्गिक असून नागरिकांनी कोणतीही अफवा पसरवू नये, असे वन विभागाने स्पष्ट केले आहे. वाघिणीला कोणताही त्रास न देता सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून, वाघिणीच्या हालचालींवर सातत्याने जीपीएसद्वारे लक्ष ठेवले जात आहे.

चिपळूण तालुक्यातील नांदिवसे गावच्या डोंगराळ भागात जिथे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाची हद्द आहे. त्या परिसरात हिरकणीची एन्ट्री झाली आहे. परंतु, ग्रामस्थांना त्याचा कोणताही धोका नाही. येथील नागरिकांनी जंगलात जाऊ नये. तसेच, वाघ किंवा इतर कोणताही प्राणी दिसल्यास प्रथम वन विभागाशी संपर्क करावा.- साताप्पा सावंत, वनपाल चिपळूण

Web Title : चांदोली की 'हिरकणी' बाघिन चिपलूण में मिली; नांदिवसे के पास दहाड़।

Web Summary : कोयना अभयारण्य से स्थानांतरित बाघिन 'हिरकणी' (एसटीआर 06) चिपलूण के पास घूम रही है। वन अधिकारियों ने नांदिवसे के ग्रामीणों को सतर्क किया और सावधानी बरतने की सलाह दी। पेंच से स्थानांतरित, 'हिरकणी' सह्याद्री टाइगर रिजर्व में शामिल हुई, जिससे प्रजनन की संभावना बढ़ गई। नागरिकों से अफवाहें फैलाने से बचने का आग्रह किया गया है।

Web Title : Chandoli's 'Hirkani' Tigress Found in Chiplun; Roars Near Nandivase.

Web Summary : Tigress 'Hirkani' (STR 06), relocated from Koyna sanctuary, roams near Chiplun. Forest officials alert Nandivase villagers, advising caution. Transferred from Pench, 'Hirkani' joins Sahyadri Tiger Reserve, boosting breeding prospects. Citizens are urged to avoid spreading rumors.