Ratnagiri: मंडणगडात ३० हजारांची लाच घेताना 'महसूल'चे तिघे जाळ्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 13:56 IST2025-05-28T13:54:20+5:302025-05-28T13:56:04+5:30

लाचेच्या रकमेचे वाटप

Three revenue officials caught while taking a bribe of Rs 30000 in Mandangad | Ratnagiri: मंडणगडात ३० हजारांची लाच घेताना 'महसूल'चे तिघे जाळ्यात

Ratnagiri: मंडणगडात ३० हजारांची लाच घेताना 'महसूल'चे तिघे जाळ्यात

मंडणगड : पत्नीच्या नावे लिलावामध्ये घेतलेल्या शेतजमिनीची फेरफार नोंद करून तसा साताबारा देतो, असे सांगून तब्बल ३० हजारांची लाच घेताना मंडल अधिकाऱ्यांसह ग्राम महसूल अधिकारी आणि शिपायाला मंगळवारी सायंकाळी रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई रत्नागिरी लाचलुचपत विभागाच्या पथकाने केली. याप्रकरणी तिघांना ताब्यात घेऊन मंडणगड पाेलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

म्हाप्रळचे मंडळ अधिकारी अमित शिगवण, सजा म्हाप्रळचे ग्राम महसूल अधिकारी श्रीनिवास श्रीरामे (अतिरिक्त कार्यभार साेवेली) आणि मंडणगड उपकाेषागार कार्यालयातील शिपाई मारुती भाेसले अशी ताब्यात घेण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. तक्रारदार यांनी त्यांच्या पत्नीच्या नावे तालुक्यातील मौजे शेणाळे याठिकाणी लिलावामध्ये शेतजमीन खरेदी केली आहे.

या जमिनीची फेरफार नोंद करुन तसा सातबारा उतारा संबंधित मंडळ अधिकारी व तलाठी यांच्याकडून करून देतो, असे शिपाई मारुती भोसले यांनी सांगितले हाेते. त्यासाठी तक्रारदारांकडून ५० हजाराची मागणी केली होती. त्यापैकी ४५ हजार रुपये मारुती भोसले यांनी ऑनलाइन स्वीकारली हाेती.

मात्र, ही फेरफार नोंद मंडळ अधिकारी यांनी पूर्ण रक्कम न मिळाल्याने रद्द केल्याने तक्रारदाराने मंगळवारी मंडळ अधिकारी अमित शिवगण, ग्राम महसूल अधिकारी श्रीनिवास श्रीरामे व शिपाई मारुती भोसले यांची भेट घेतली. त्यावेळी फेरफार नोंद मंजूर करण्यासाठी मंडल अधिकारी शिगवण यांनी तक्रारदाराकडे ३० हजार रुपये लाचेची मागणी केली. तक्रारदार यांनी ही रक्कम त्यांना दिली आणि ते जाळ्यात सापडले. या लाचप्रकरणी तिघांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.

ही कारवाई रत्नागिरी लाचलुचत प्रतिबंधक विभागाचे पाेलिस उपअधीक्षक अविनाश पाटील, पाेलिस निरीक्षक मच्छिंद्र जाधव, सहायक पाेलिस फाैजदार उदय चांदणे, हवालदार संजय वाघाटे, विशाल नलावडे, दीपक अबिकर, काॅन्स्टेबल राजेश गावकर, हेमंत पवार, वैशाली धनवडे यांनी केली.

लाचेच्या रकमेचे वाटप

लाच घेतलेल्या रकमेतील स्वतःचा हिस्सा १५,५०० रुपये मंडळ अधिकारी शिगवण यांनी स्वतःसाठी ठेवला. उर्वरीत १४,५०० रुपयांचा हिस्सा ग्राम महसूल अधिकारी श्रीनिवास श्रीरामे यांना दिला.

Web Title: Three revenue officials caught while taking a bribe of Rs 30000 in Mandangad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.