रत्नागिरी : भर पावसात मासेमारीसाठी गेलेले तिघे नदीपात्रात अडकल्याची घटना चिपळूण तालुक्यातील खडपोली येथे रविवारी रात्री उशिरा घडली होती. या घटनेची माहिती मिळताच चिपळूणचे प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांच्या नेतृत्वाखाली चिपळूण तालुका प्रशासन रेस्क्यू टीमने बचावकार्य सुरु केले. यावेळी महसूल, पोलिस, नगर परिषद, आरोग्य विभाग, महानिर्मिती, आपदा मित्र घटनास्थळी दाखल झाले होते. रात्री उशिरापर्यंत चार तासांच्या अथक प्रयत्नांनंतर अडकलेल्या तिघांना बाहेर काढण्यात आले. यामध्ये एक महिला, लहान मुलगा व एका प्रौढाचा समावेश होता.
अडकलेले नागरिक नदीपात्रात मासेमारी करायला गेले होते. अचानक पाणी वाढल्याने ते अडकले होते. मात्र, नदीपात्रात एक बेट असल्याने ते बेटावर सुरक्षित उभे राहिले होते. चिपळूण रेस्क्यू टीम या तिघांसाठी देवदूत ठरली आहे.
अडकलेल्यांमध्ये संतोष वसंत पवार (४०), पत्नी सुरेखा संतोष पवार (३५, दोघे रा. दळवटणे) त्यांचा पुतण्या ओंकार रवी पवार (१७, रा. दळवटणे राजवाडा) यांचा समावेश होता. या सगळ्यांना दोरीच्या सहाय्याने सुखरूप बाहेर काढण्यात रेस्क्यू टीमला यश आले आहे.