Ratnagiri: मुलाला वाचवताना आई, आत्यासह तिघांचा बुडून मृत्यू; वाशिष्ठी नदीच्या डोहात घडली घटना
By संदीप बांद्रे | Updated: April 25, 2025 19:24 IST2025-04-25T19:24:29+5:302025-04-25T19:24:53+5:30
चिपळूण : तालुक्यातील खडपोली रामवाडी येथील वाशिष्ठी नदीच्या डोहात मुलाला वाचवताना आई, आत्यासह तिघांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना आज, ...

Ratnagiri: मुलाला वाचवताना आई, आत्यासह तिघांचा बुडून मृत्यू; वाशिष्ठी नदीच्या डोहात घडली घटना
चिपळूण : तालुक्यातील खडपोली रामवाडी येथील वाशिष्ठी नदीच्या डोहात मुलाला वाचवताना आई, आत्यासह तिघांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना आज, शुक्रवारी (दि.२५) दुपारच्या सुमारास घडली. या घटनेमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे, तर खडपोली गाव शोकमय झाले आहे.
खडपोली रामवाडी येथील लता शशिकांत कदम (३५), लक्ष्मण शशिकांत कदम ( ८ ), रेणुका धोंडीराम शिंदे (४५) तिघेही जन खडपोली रामवाडी येथील डोहात कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी लक्ष्मण शशिकांत कदम हा पाण्यात खेळत होता. काही वेळाने तो पाण्यात बुडत असल्याचे त्याची आई लता शशिकांत कदम हिने पाहिले आणि त्याला वाचविण्यासाठी तिने नदीत उडी मारली. मात्र तीही बुडत होती.
ग्रामस्थांचे प्रयत्न असफल
त्यामुळे माय लेकरांना वाचवण्यासाठी मुलाची आत्या रेणुका धोंडीराम शिंदे यांनी पाण्यात उडी मारली आणि तिघांचाही डोहात बुडून मृत्यू झाला. ही घटना दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली. यावेळी ग्रामस्थांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र तो असफल ठरला.
या घटनेची माहिती अलोरे शिरगाव पोलिसांना समजताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांच्यावर दादर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविचेदन करून त्यांचे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. त्यांच्यावर अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. सदरच्या घटनेने खडपोली रामवाडीत शोकामय झाली आहे. अधिक तपास अलोरे शिरगावचे पोलिस निरीक्षक भारत पाटील करीत आहेत.