Thousands of devotees from Ratnagiri district celebrate Jakhmata Devi's sprint festival in Sangameshwar | संगमेश्वरात रंगला जाखमाता देवीचा शिंपणे उत्सव-रत्नागिरी जिल्ह्यातून हजारो भाविक सहभागी
संगमेश्वरात रंगला जाखमाता देवीचा शिंपणे उत्सव-रत्नागिरी जिल्ह्यातून हजारो भाविक सहभागी

ठळक मुद्दे फेऱ्याने केली सांगता

देवरूख : संगमेश्वरची ग्रामदेवता जाखमातेचा शिंपणे उत्सव शुक्रवारी लाल रंगाची उधळण व काजूगर घातलेल्या मटणासोबत भाकरी अशा प्रसादाचा लाभ घेऊन मोठ्या उत्साहामध्ये हा शिंपणे उत्सव साजरा केला. या शिंपण्याची सांगता सायंकाळी फेऱ्याने करण्यात आली. या उत्सवासाठी रत्नागिरी जिल्ह्यातून हजारो भाविक सहभागी होऊन लाल रंगात न्हाऊ न निघाले होते. 

दुपारपासून गणपती मंदिर येथून फेऱ्याला सुरूवात झाली. फेऱ्यामध्ये बैलगाड्यांमधून रंगांची उधळण करण्यात आली. या उत्सवात वापरण्यात येणारा रंग लाल असतो. लाल रंगाची उधळण हेच कसबा येथील रंगपंचमीचे खास वैशिष्ट्य असून, हा लाल रंग विजयाचे आणि शौर्याचे प्रतीक आहे. या उत्सवावेळी  जाखमातेचा जयजयकार करत लाल रंग एकमेकांवर उडवत शिंपणे साजरे करण्यात आले. या उत्सवाप्रसंगी नवसाचे बोकड व कोंबडी यांचे बलिदान दिले जाते. यानुसार शिंपणे दिनीही नवस फेडण्याचा कार्यक्रम पार पडला. 

यावर्षी जाखमातेच्या दर्शनाचा लाभ संगमेश्वरच्या माहेरवाशिणी पतीसोबत घेतानाचे चित्र पाहावयास मिळाले. या उत्सवासाठी नवविवाहीत महिला पतीसह खास आदल्या दिवशी कसबा संगमेश्वर येथे देवी जाखमातेचे दर्शन घेऊन देवीला फळे वाहतात.. घरातील लहान मुलांनी जावयाला रंगवण्याची पध्दत संगमेश्वरमध्ये अनेक वर्षे सुरू आहे. ही प्रथा आजही पाहायला मिळते. मटण - भाकरी - वडे हा प्रसाद असल्याने मांसाहार करण्याचा वार धरूनच शुक्रवारी हा उत्सव साजरा करण्यात आला. कसबा येथील या मंदिराच्या शेजारी रंगांची तळी उभारली जातात. ही तळी या उत्सवाच्या दिवशी फोडतात, याला लेंडी फोडणे असे म्हणतात.  याप्रमाणे लेंडी फोडण्याचा कार्यक्रम शुक्रवारी प्रतिवर्षाप्रमाणे आनंदात पार पडला. मुंबई - गोवा महामार्गावरून जाणाऱ्या प्रत्येक नागरिकाला याहीवर्षी मटण भाकरीचा प्रसाद वाटप करण्यात आला. 

सोळजाई देवीचाही शिंपणे उत्सव
तमाम आबाल वृध्दांच्या उत्साहाला उधाण आणणारा देवरूखातील ४४ खेड्यांची मालकीण श्री देवी सोळजाई देवीचा शिंपणे उत्सव शुक्रवारी साजरा करण्यात आला. या उत्सवाचा रंगपंचमी फेरा हा तमाम जनतेला आकर्षित करणारा ठरला. या शिंपण्याने शिमगोत्सवाची सांगता करण्यात आली. याचवेळी देवीच्या मंदिर परिसरातून रंगांचा फेरा काढण्यात आला. या फेऱ्यात रंगांनी भरलेल्या बैलगाड्या, टेम्पो यांच्या जोडीला ढोलताशांची साथ होती. फेºयामध्ये मिळणाऱ्या  प्रत्येक नागरिकावर रंगांची उधळण क रण्यात आली. फेरा सोळजाई मंदिरापर्यंत पुन्हा येऊन शिमगोत्सव व शिंपण्याची सांगता करण्यात आली.

Web Title: Thousands of devotees from Ratnagiri district celebrate Jakhmata Devi's sprint festival in Sangameshwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.