Ratnagiri: अर्ज भरण्याची मुदत सुरू, उमेदवारांची यादी अजून गुलदस्त्यातच
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 18:24 IST2025-11-12T18:21:56+5:302025-11-12T18:24:56+5:30
Local Body Election: इच्छुकांनी ‘देव बुडवले पाण्यात’

Ratnagiri: अर्ज भरण्याची मुदत सुरू, उमेदवारांची यादी अजून गुलदस्त्यातच
रत्नागिरी : महायुती आणि महाविकास आघाडी होणार, हे आता निश्चित झाले असले तरी अजूनही यातील एकाही पक्षाने आपल्या उमेदवारांची अधिकृत घोषणा केलेली नाही. जागावाटपात कोणाला किती जागा आहेत, याची माहितीही अजून जाहीर झालेली नाही. अनेक इच्छुकांना काम सुरू करण्याचे आदेश असले तरी आपली उमेदवारी नक्की असेल की नाही, याबाबत त्यांच्या मनातील संभ्रम कायम आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत सुरू होऊन दोन दिवस झाले तरी अजूनही महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या अधिकृत उमेदवार याद्या मात्र अजून वरिष्ठांच्याच हातात आहेत. अनेक इच्छुक उमेदवारांनी आता देव पाण्यात बुडवून ठेवले असल्याची मिश्कील चर्चाही आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
जिल्ह्यात चार नगर परिषदा आणि तीन नगर पंचायतींमध्ये ही निवडणूक होत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत सुरू होऊन दोन दिवस झाले तरी महायुती आणि महाविकास आघाडीमधील एकाही उमेदवाराचा अर्ज दाखल झालेला नाही. घटक पक्षात कोणाला किती जागा मिळणार, याचे सूत्र वरिष्ठ पातळीवर ठरले असले तरी त्याबाबत अजून काेणतीही माहिती उमेदवारांपर्यंत पोहोचलेली नाही. त्यामुळे उमेदवारी मिळण्याबाबत अजूनही संभ्रमावस्था आहे.
महायुती आणि महाविकास आघाडीच्या अनेक बैठका झाल्या आहेत. त्यात जागांबाबत चर्चा झाली आहे. मात्र ही चर्चा अजूनही इच्छुक उमेदवार तसेच कार्यकर्त्यांपर्यंत आलेली नाही. त्यामुळे नेमके काय होणार, याबाबत अजूनही इच्छुकंच्या मनात शंका आहे.
बंडखोरीची शक्यता अधिक
महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये प्रमुख लढती होतील, अशी अपेक्षा आहे. मात्र या दोन्ही बाजूच्या सहाही पक्षांमध्ये उमेदवारीसाठी चढाओढ आहे. नगराध्यक्ष पदासह नगरसेवक हाेण्यासाठीही अनेक जण इच्छुक आहेत. त्यामुळे एकाला उमेदवारी दिली की दुसरा नाराज होणार, हे निश्चित आहे. सद्यस्थितीत असलेली इच्छुकांची संख्या लक्षात घेता यावेळी बंडखोरी वाढण्याची शक्यता अधिक आहे.
म्हणूनच याद्यांना विलंब
एकापेक्षा अधिक उमेदवार इच्छुक असल्याने आणि जागा वाटपात प्रत्येक पक्षाच्या वाट्याला मर्यादित जागा येणार असल्याने नाराज वाढण्याची भीती सर्वच पक्षांना आहे. या नाराजीतून बंडखोरी वाढण्याचीही भीती आहे. अशा नाराजांना बंडखोरी करण्यासाठी फारसा वेळ मिळू नये, यासाठीच महायुती आणि महाविकास आघाडीतील सर्वच पक्षांनी आपली यादी अजून जाहीर केलेली नसल्याची शक्यता अधिक आहे.