..तर कॅबिनेट मंत्रिपद मिळालं असते; दापोलीतील कार्यक्रमात योगेश कदम यांनी सांगून टाकलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2026 15:04 IST2026-03-23T15:02:29+5:302026-03-23T15:04:22+5:30
५० वर्षांची उणीव काही लगेचच पाच वर्षांत भरून काढता येत नाही

संग्रहित छाया
रत्नागिरी : मी हट्ट धरला असता तर मला कॅबिनेट मंत्रिपदही मिळाले असते; पण कॅबिनेट मिळाले असते तर कदाचित एकच खातं मिळालं असतं आणि मला खात्री नव्हती की, काेणतं खातं मिळेल. त्यामुळे मी स्वत:हून राज्यमंत्रिपद मागून घेतलं. कारण, त्या पदाच्या माध्यमातून काेकणात काही चांगल्या गाेष्टी करू शकताे, अशा भावना राज्यमंत्री याेगेश कदम यांनी दापाेलीतील एका कार्यक्रमात बाेलताना व्यक्त केल्या.
दापाेलीतील एका खासगी रुग्णालयाच्या उद्घाटन साेहळ्यासाठी मंत्री याेगेश कदम उपस्थित हाेते. शनिवारी सायंकाळी पार पडलेल्या या कार्यक्रमात मंत्री याेगेश कदम यांनी प्रथमच आपल्या मनातील भावना सर्वांसमाेर व्यक्त केल्या. ते म्हणाले की, आज ५० वर्षांनंतर दापाेली तालुक्याला मंत्रिपद मिळाले आहे. हा खूप माेठा कालावधी आहे. त्यामुळे ५० वर्षांची उणीव काही लगेचच पाच वर्षांत भरून काढता येत नाही. त्याकरिता अनेक याेजना राबवल्या गेल्या पाहिजेत, त्यासाठी प्रयत्न करताेय, असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, कदाचित मी हट्ट धरला असता तर मला कॅबिनेटपदही मिळालं असतं; पण मी राज्यमंत्रिपद मागू घेतलं. कारण, मला खात्री हाेती की, कॅबिनेटपद मिळालं तर एकच खातं येईल आणि कुठलं खातं येईल, याची खात्री नव्हती; पण जर राज्यमंत्रिपद मिळालं तर चांगली खाती मिळू शकतात, हे माहिती हाेतं.
आधी मतदारसंघ
मंत्री म्हणून माझ्या डाेळ्यांसमाेर आधी दापाेली मतदारसंघ, मग माझं काेकण आणि नंतर महाराष्ट्र, असे सूत्र ठेवून मी काम करत आहे. माझ्याच सहकाऱ्यांना न्याय देण्याचा माझा प्रयत्न आहे. याेग्य व्यक्तीही याेग्य स्तरावर असली पाहिजे, अशी माझी धारणा असल्याचे ते म्हणाले.