दापोलीत थंडीचा कहर; पारा ८.५ अंशावर, आंब्यासाठी पोषक ठरणार वातावरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 18:25 IST2025-11-20T18:24:15+5:302025-11-20T18:25:14+5:30
गारठ्यामुळे सर्दी, खोकल्याचे रुग्ण वाढले

संग्रहित छाया
शिवाजी गोरे
दापोली : कोकणचे मिनी महाबळेश्वर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दापोलीत गेल्या चार-पाच दिवसांत थंडीचा जोर वाढला असून, दापोलीतील तापमानाचा पारा तब्बल ८.५ अंशापर्यंत घसरला आहे. यंदाच्या हंगामातील हे सर्वात कमी तापमान असल्याची नोंद हवामान विभागाने केली. त्यामुळे मिनी महाबळेश्वर गारठून गेले आहे.
बराच काळ पडलेल्या पावसामुळे आंबा बागायतदारांमध्ये चिंतेचे वातावरण होते. मात्र आताच्या कडाक्याच्या थंडीमुळे त्यांना दिलासा मिळाला आहे. दिवसभर ऊन आणि रात्री थंडी असे वातावरण आंब्यासाठी पोषक ठरणार आहे. एका बाजूला आंबा बागायतदारांनी समाधान व्यक्त करत असले, तरी हवेतल्या आर्द्रतेतील बदल आणि गारठ्यामुळे सर्दी, खोकल्याचे रुग्णही वाढू लागले आहेत.
गेल्या पाच दिवसांत दापोलीतील तापमान
- १५ नोव्हेंबर : कमाल ३१.५° C, किमान ११.५° C
- १६ नोव्हेंबर : कमाल ३१° C, किमान १०° C
- १७ नोव्हेंबर : कमाल ३०.६° C, किमान ९.५° C
- १८ नोव्हेंबर : कमाल ३०.६° C, किमान ८.५° C
- १९ नोव्हेंबर : कमाल ३१.१° C, किमान ९.५° C
यंदाचे सर्वात कमी तापमान
१८ नोव्हेंबर रोजी नोंदलेले ८.५ अंश तापमान हे यंदाचे दापोलीतील सर्वात कमी तापमान ठरले आहे. हवामान विभागाने पुढील काही दिवस सकाळ-रात्री थंडी कायम राहण्याची शक्यता वर्तवली असून, नागरिकांनी विशेषत: लहान मुले व ज्येष्ठांनी काळजी घ्यावी, असे आवाहन केले आहे.