अखेर एनआरएचएम कर्मचाऱ्यांचा संप २३ दिवसांनी मागे, १० मागण्यांना तत्त्वतः मान्यता
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2025 17:27 IST2025-09-11T17:26:35+5:302025-09-11T17:27:06+5:30
एकत्रीकरण समितीच्या लढ्याला यश

अखेर एनआरएचएम कर्मचाऱ्यांचा संप २३ दिवसांनी मागे, १० मागण्यांना तत्त्वतः मान्यता
रत्नागिरी : राष्ट्रीय आरोग्य अभियानातील (एनएचएम) कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासमवेत झालेल्या बैठकीनंतर बुधवारी (दि. १०) अखेर मागे घेण्यात आला. शासनाने या कर्मचाऱ्यांच्या १३ पैकी १० मागण्यांना तत्त्वतः मान्यता दिली. तसे पत्र राष्ट्रीय आरोग्य अभियान एकत्रीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांना देण्यात आले. यामुळे गेल्या २३ दिवसांपासून सुरू असलेला बेमुदत संप अखेर मागे घेण्याचा निर्णय संघटनेने घेतला.
१४ मार्च २०२४ रोजी झालेल्या शासन निर्णयाची अंमलबजावणी व्हावी, यासाठी १९ ऑगस्टपासून ‘एनआरएचएम’च्या जिल्ह्यातील सुमारे ८०० अधिकारी व कर्मचाऱ्यांचे बेमुदत काम बंद आंदोलन सुरू होते. या आंदोलनाचा मोठा परिणाम जिल्ह्यातील आरोग्यसेवेवर झाला होता. आपल्या मागण्यांसाठी शासनाला जाग यावी, यासाठी ‘एनआरएचएम’च्या कर्मचारी, अधिकाऱ्यांनी रत्नागिरी शहरातून रॅली काढली होती. त्यानंतरही बुधवारपर्यंत हे आंदोलन सुरू होते.
कर्मचारी मूल्यांकन अहवालानुसार, मानधनवाढ न करता सरसकट दरवर्षी ८ टक्के व एकवेळची बाब म्हणून सन २०२५ व २६ मध्ये १० टक्के वार्षिक वाढ करावी, ३ व ५ वर्षे सेवा पूर्ण झालेले अधिकारी व कर्मचारी यांना लॉयटी बोनस पूर्ववत लागू करणे, वेतन सुरक्षा नियमानुसार मानधन संरक्षित करावे, जुन्या कर्मचाऱ्यांची नवीन ठिकाणी नियुक्ती झाल्यास लागू करणे,
कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण अपघाती मृत्यू पाच लक्ष अपंगत्व २५ लाख औषधोपचार २ ते ५ लाखप्रमाणे लागू करणे, यासह समायोजनाबाबत पहिल्या टप्प्यात १० वर्षांहून अधिक सेवा पूर्ण झालेल्या जिल्ह्यातील शेकडो कर्मचाऱ्यांना फायदा होणार असून, भविष्यात सर्व राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे. काही मागण्या टप्प्याटप्प्याने मार्गी लागणार आहेत. मागण्या मंजूर झाल्याने हे आंदोलन मागे घेण्यात आले असून, ‘एनआरएचएम’च्या कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले.