..अन् जाब विचारत पोलिसालाच केली धक्काबुक्की, रत्नागिरीत एकावर गुन्हा दाखल
By अरुण आडिवरेकर | Updated: March 27, 2023 18:21 IST2023-03-27T18:21:20+5:302023-03-27T18:21:41+5:30
सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी शहर पाेलिस स्थानकात गुन्हा दाखल

..अन् जाब विचारत पोलिसालाच केली धक्काबुक्की, रत्नागिरीत एकावर गुन्हा दाखल
रत्नागिरी : भावाच्या रिक्षाच्या समाेरील सीटचा फाेटाे काढल्याच्या रागातून वाहतूक पाेलिसालाच जाब विचारत धक्काबुक्की केल्याचा प्रकार २६ मार्च राेजी सायंकाळी ५:५५ वाजता साळवी स्टाॅप येथे घडला. याप्रकरणी पाेलिसांनी सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रमेश चंद्रकांत खेत्री (पूर्ण पत्ता माहीत नाही) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी वाहतूक शाखेचे पाेलिस शिपाई प्रशांत प्रकाश बंडबे (३३) यांनी फिर्याद दिली आहे. प्रशांत बंडबे रविवारी सायंकाळी ४ ते ८ या वेळेत साळवी स्टाॅप येथे कर्तव्यावर हाेते. सायंकाळी ५:५५ वाजण्याच्या दरम्यान मिऱ्या-नागपूर महामार्गावर रमेश खेत्री हा रिक्षा (एमएच ०८, एक्यू ५९६८) घेऊन तिथे आला. त्याच्यासाेबत नरेंद्र बाबुराव बिरादार (३३, रा. कीर्तीनगर, रत्नागिरी) आणि विक्रांत श्रीधर शिंदे (३१, रा. कारवांची वाडी, रत्नागिरी) हे दाेघे हाेते.
रमेश खेत्री याने रिक्षातून उतरून भावाच्या रिक्षाचे फाेटाे काढल्याबाबत बंडबे यांना जाब विचारला. एवढ्यावरच न थांबता ढकलून देत शिविगाळ केली. तसेच धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. कर्तव्यावर असताना सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी रमेश खेत्री याच्यावर शहर पाेलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पाेलिस करत आहेत.