बाहेर जातो असे सांगून घरातून अल्पवयीन मुलगा बाहेर पडला, अन्..
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2022 16:12 IST2022-08-01T16:11:35+5:302022-08-01T16:12:09+5:30
तक्रारीवरून शहर पोलिसांनी तत्काळ मुलाचा शोध घेण्यास सुरुवात केली. तांत्रिक माहितीच्या आधारे हा मुलगा पंढरपूर येथे असल्याची माहिती मिळाली पण..

बाहेर जातो असे सांगून घरातून अल्पवयीन मुलगा बाहेर पडला, अन्..
रत्नागिरी : बाहेर जातो असे सांगून घरातून बाहेर पडलेल्या रत्नागिरी शहरातील अल्पवयीन मुलाने आपल्या मित्राशी संपर्क ठेवला हाेता. त्याआधारे त्या मित्राकडे चाैकशी करत पाेलिसांनी अवघ्या पाच दिवसात पंढरपूर येथून त्याला ताब्यात घेण्यात आले.
रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात २४ जुलै रोजी शहर पोलीस स्थानकात अल्पवयीन मुलाच्या नातेवाइकांनी मुलाला पळवून नेल्याची तक्रार दिली. या तक्रारीवरून शहर पोलिसांनी तत्काळ मुलाचा शोध घेण्यास सुरुवात केली. तांत्रिक माहितीच्या आधारे हा मुलगा पंढरपूर येथे असल्याची माहिती मिळाल्यावर गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या टीमने तिथे जाऊन त्याला ताब्यात घेतले व शहर पोलीस स्थानकात आणले.
या मुलाकडे मोबाइल असल्यामुळे पोलीस त्याचा शोध घेत होते. मात्र, त्याने काही काळ माेबाइल बंद ठेवल्याने त्याचा शाेध लागत नव्हता. मात्र, काही काळ मोबाइल सुरू करून तो वारंवार एकाच नंबरला काॅल करत असल्याचे पाेलिसांच्या लक्षात आले. पाेलिसांनी त्या नंबरचा सीडीआर तपासला.
त्यानंतर त्याने संपर्क साधलेल्या त्याच्या मित्राशी पाेलिसांनी संपर्क साधला. त्यानंतर ताे पळून गेलेला मुलगा पंढरपुरात असल्याचे समाेर आले आणि पाेलिसांनी त्याला ताब्यात घेतले. यावेळी त्याच्यासाेबत एक अल्पवयीन मुलगीही असल्याचे समाेर आले. तिलाही पाेलिसांनी त्याच्यासाेबत ताब्यात घेतले आहे.