Ratnagiri Politics: चिपळूणात गटबाजीचा धोका, नेत्यांच्या विभक्त भूमिकांमुळे उमेदवार चिंतेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 17:40 IST2025-11-15T17:39:30+5:302025-11-15T17:40:42+5:30
Local Body Election: नगराध्यक्ष पदाचा गुंता अजूनही सुटेना

Ratnagiri Politics: चिपळूणात गटबाजीचा धोका, नेत्यांच्या विभक्त भूमिकांमुळे उमेदवार चिंतेत
चिपळूण : नगर परिषद निवडणुकीसाठी महायुती व महाविकास आघाडीतही सुरु असलेली चर्चा आता अंतिम टप्प्यात आली आहे. मात्र अजूनही नगराध्यक्ष पदाचा गुंता सुटलेला नाही. उध्वव सेनेतील एक गट कॉंग्रेस सोबत जाण्यास अनुकूल आहे. तर दुसरा गट आमदार भास्कर जाधव यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी शरद पवार पक्षासोबत निवडणूक लढवण्याची तयारी करत आहे. हीच परिस्थिती महायुती निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. नेत्यांच्या या विभक्त भूमिकांमुळे पक्षांतर्गत गतबाजीचा धोका वाढू लागला आहे.
चिपळूण नगरपरिषदेसाठी महायुती व महाविकास आघाडी अशी थेट लढत होणार अशी श्यक्यता असताना गेले काही दिवस फक्त बैठका आणि चर्चा असेच सत्र सुरू आहेत. कधी महायुतीचे जुळतंय तर कधी महाविकास आघाडीचे फिस्कटतय अशी परिस्थिती दिसून येत आहे. दोन्ही बाजूने अद्याप अधिकृत अशी कोणतीच घोषणा झालेली नाही. परंतु प्रत्येक पक्षांनी आपले उमेदवार तयार करून ठेवले आहेत. आता उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत येत्या दोन दिवसात संपुष्टात येत असल्याने वेगवान घडामोडी सुरू झाले आहेत.
या निवडणुकीच्या माध्यमातून शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव पुन्हा एकदा केंद्रस्थानी आले आहेत. आज शुक्रवारी काँग्रेसचे नेते हुसेन दलवाई,जिल्हाध्यक्ष सोननलक्ष्मी घाग, राष्ट्रवादीचे नेते माजी आमदार रमेश कदम यांच्यासह तिन्ही पक्षाचे प्रमुख पदाधिकारी थेट आमदार भास्कर जाधव यांच्या कार्यालयात पोहचले आणि महाविकास आघाडी संदर्भात महत्वपूर्ण चर्चेला सुरुवात झाली. या बैठकीच्या चर्चेचा पूर्ण तपशील उपलब्ध झाला नसला तरी चर्चा सकारात्मक झाल्याची चर्चा ऐकण्यास मिळत आहे.
तसेच माजी आमदार रमेश कदम यांनी शनिवारी नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. याच बरोबर उद्धव सेना आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नगरसेवक पदाचे काही उमेदवार देखील उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. परंतु काँग्रेसची भूमिका अद्यापही गुलदस्त्यात आहे. मात्र माजी खासदार हुसेन दलवाई आघाडीसाठी सकारात्मक असल्याने काँग्रेस देखील महाविकास आघाडीत सहभागी होण्याची श्यक्यता वर्तवण्यात येत आहे.
अजित पवार गट अलिप्त
महाविकास आघाडीचे गणित जुळत असताना महायुतीचे अद्याप तळ्यातमळ्यात सुरू आहे. राष्ट्रवादी अजित पवार पक्ष महायुतीतून पूर्णपणे बाजूलाच असल्याचे निदर्शनास येत आहे. राष्ट्रवादीकडून नगराध्यक्ष पदासाठी मिलिंद कापडी यांनी तयारी केली असून तेही शनिवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. इतकेच नव्हे तर त्यांच्या बरोबर राष्ट्रवादीकडून नगरसेवक पदासाठी इच्छुक असलेले उमेदवार देखील उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
आतापर्यंत सहा अर्ज
आतापर्यंत नगर परिषद निवडणुकीसाठी एकूण सहा उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. शुक्रवारी उद्धव सेनेकडून राजेश सुरेंद्र देवळेकर यांनी नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरला. तर प्रभाग ११ ब मधून अंकुश अशोक आवले यांनी शिंदे सेनेतर्फे उमेदवारी दाखल केली आहे.