रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला; आठवड्यानंतर सूर्य दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 15:50 IST2025-05-29T15:47:12+5:302025-05-29T15:50:39+5:30

हवामान खात्याने ३१ मेपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली

The intensity of rains has reduced in Ratnagiri district | रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला; आठवड्यानंतर सूर्य दर्शन

रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला; आठवड्यानंतर सूर्य दर्शन

रत्नागिरी : जिल्ह्यात मंगळवार (दि. २७ मे) पर्यंत दिवसभर संततधार धरलेल्या पावसाने रात्री उशिरा विश्रांती घेण्यास सुरुवात केली. रात्रभर पाऊस थांबला होता. सकाळी आठवड्यानंतर काही काळ सूर्य दर्शनही झाले. त्यानंतर दिवसभर मात्र हलक्या सरी वगळता पावसाने उघडीप दिली होती. मंगळवारी सकाळपासून बुधवारी सकाळपर्यंत जिल्ह्यात ३७.९६ मिलीमीटर सरासरी पावसाची नोंद जिल्हा नियंत्रण कक्षात करण्यात आली आहे.

जिल्ह्यात २१ मेपासून पावसाने मुसळधार पडण्यास सुरुवात केली आहे. या मे महिन्यात पडलेल्या पावसाची आकडेवारी वार्षिक सरासरीच्या १५ टक्के आहे. गेल्या २५ वर्षांत पहिल्यांदाच मे महिन्यात पंधरा दिवस पावसाने हजेरी लावली आहे. मंगळवारी रात्रीपासून पावसाचा जोर कमी झाला. संपूर्ण रात्र पाऊस शांत होता. बुधवारी सकाळी काही काळ सूर्य दर्शन झाल्याने नागरिकांना हायसे वाटले. दिवसभरात हलक्या सरी वगळता पावसाचे उघडीप दिली होती.

सायंकाळी जोरदार वारा सुटला होता. आभाळही अंधारून आल्याने पुन्हा मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वाटत होती. मात्र, रात्रीपर्यंत पाऊस हलक्या सरींवर होता. दरम्यान जिल्ह्यात ३१ मेपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे.

Web Title: The intensity of rains has reduced in Ratnagiri district