‘झटपट श्रीमंती’च्या स्वप्नाने उडवली झोप, रत्नागिरी जिल्ह्यात शेकडो कोटींची लूट
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 13:37 IST2025-12-17T13:36:19+5:302025-12-17T13:37:33+5:30
डझनभर बोगस फायनान्स कंपन्यांनी हजारो लोकांच्या जमापुंजीवर मारला हात

‘झटपट श्रीमंती’च्या स्वप्नाने उडवली झोप, रत्नागिरी जिल्ह्यात शेकडो कोटींची लूट
चिपळूण : दोन दशकात डझनभर बोगस फायनान्स कंपन्यांनी ‘झटपट श्रीमंती’ची स्वप्ने दाखवून जिल्ह्यातील लाखो लोकांची कोट्यवधी रुपयांची लूट केली आहे. कन्नन फायनान्स, संचयनी, कल्पतरू, निसर्ग, ईडू, जश्न लाँड्री, अर्न इंडिया, पल्स ग्रीन, पॅगोडा फॉरेस्ट, ट्विंकल, संजीवनी, पॅनकार्ड, बिटकॉईन, कडकनाथ, शाईन इंडिया, आरजू अशा अनेकविध कंपन्यांनी येथे अधिक मोबदल्याचे आमिष दाखवून हजारो लोकांची आयुष्यभराची जमापुंजी लुटून नेली. आता शेअर मार्केटच्या नावाखाली टीडब्लूजे कंपनीनेही जिल्ह्यात हजारो लोकांची लूट केली आहे. त्यात सर्वाधिक फसले गेले आहेत ते चिपळूण नागरिक.
झटपट श्रीमंत होण्याच्या हव्यासापोटी गुंतवणूकदारांना शहाणपण येत नसल्याने अशा कंपन्यांचे पीक कोकणात फोफावत आहे. या अनेक कंपन्यांनी जिल्ह्यात काेट्यवधी रुपये गोळा करून पलायन केले आहे. आता टीडब्लूजेचे प्रकरण पुढे येताच पुन्हा एकदा बोगस फायनान्स कंपन्यांची चर्चा जोर धरत आहे. या कंपन्या आपले हातपाय कसे पसरतात, गुंतवणूकदारांना कसे आकर्षित केले जाते, या कंपन्यांवर कायदा व पोलिस यंत्रणेचा अंकुश आणि सर्वसामान्यांच्या कष्टाचे पैसे याविषयी पुन्हा एकदा चर्चा होत आहेत.
प्रत्येक तालुक्यात भपकेबाज कार्यालये थाटणाऱ्या या कंपन्यांचे संचालक आलिशान गाड्यांमधून फिरतात. त्यांचे चर्चात्मक कार्यक्रम सर्वसामान्यांवर भूल टाकणारे असतात. काही गुंतवणूकदारांना परदेशवाऱ्या घडवल्या जातात. गोवा, बँकॉक अशा विमान प्रवासाच्या संधी उपलब्ध करून देतात आणि दरवेळी अशा भपक्यांना गुंतवणूकदार बळी पडतात. या कंपन्या गुंतवणूक चेकच्या माध्यमातून स्वीकारतात. चेकने पैसे दिले म्हणजे आपली फसवणूक होणार नाही, असा एक मोठा गैरसमज लोकांमध्ये आहे. गुंतवणूकदार गोळा करण्यासाठी आकर्षक कमिशनवर एजंट नेमले जातात. हे एजंट कंपन्यांच्या बोगस कारभाराचे सर्वांत मोठे प्रसारक असतात. ही एजंटची साखळीच कंपनीसाठी ‘माया’ गोळा करून देते.
महिन्याला आठ ते दहा टक्के परतावा देणारा कोणताही व्यवसाय या कंपन्यांकडे नसतो. किंबहुना केवळ गुंतवणुकीतून एवढ्या मोठ्या प्रमाणात नफा कमावण्याची योजना जगाच्या पाठीवर कुठेही अस्तित्वात नाही. त्यामुळे परताव्याची आश्वासने ही निव्वळ धूळफेक असतात. तरीही ठेवीदार आकर्षित होतात. सुरुवातीला काही लोकांना भक्कम परतावा मिळतो. त्यामुळे गुंतवणूदार वाढतात; मात्र त्यांच्या परताव्याची रक्कम वाढू लागली की त्यांना दिलेले चेक बाऊन्स व्हायला सुरुवात होते आणि अचानक एकेदिवशी कंपनीचे कार्यालय बंद झालेले दिसते. टीडब्लूजेच्या बाबतीतही हेच घडले आणि आता गुंतवणूकदारांवर डोक्याला हात लावण्याची वेळ आली आहे.
एजंटसह अधिकाऱ्यांचे रॅकेट
संचालक मंडळ, रिजनल ऑफिसर, झोनल ऑफिसर, झोनल मॅनेजर, डेव्हलपमेंट डायरेक्टर अशा एकापेक्षा एक पदांवर काम करणारी मंडळी एक कंपनी बुडाली की दुसऱ्या कंपनीत सहजपणे उडी घेतात. नवा गडी, नवा खेळ या पद्धतीने ही साखळी काम करत असते. त्यातून लाखो रुपयांची माया गोळा केलेली असते. ठराविक रक्कम गोळा केल्यानंतर फसवणुकीचा सिलसिला घडतो.
प्रमाणपत्राच्या पावतीवर फसवणूक
सर्वांत धक्कादायक बाब म्हणजे अशा वित्तीय संस्था सुरू करण्यापूर्वी केंद्र सरकारकडून नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनीचे (एलबीएफसी) प्रमाणपत्र घ्यावे लागते. त्यासाठी या कंपन्या अर्ज करतात. तो अर्ज मिळाला, अशी पोचपावती रिझर्व्ह बँकेकडून किंवा सेबीकडून दिली जाते. अशा पोचपावत्या आकर्षक फ्रेम करून कंपनीच्या कार्यालयात लावल्या जातात. गुंतवणूकदारही त्या पत्राची कोणतीही शहानिशा करण्याच्या भानगडीत पडत नाहीत.