तब्बल ४८ तासांनी सापडला अश्विनीचा मृतदेह, नीलेशचा शोध सुरूच; दाम्पत्याने वाशिष्ठी नदीत घेतली होती उडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2025 17:19 IST2025-08-02T17:17:59+5:302025-08-02T17:19:35+5:30
एनडीआरएफ पथक, पोलिस व अहिरे यांचे नातेवाईक घेत आहेत शोध

तब्बल ४८ तासांनी सापडला अश्विनीचा मृतदेह, नीलेशचा शोध सुरूच; दाम्पत्याने वाशिष्ठी नदीत घेतली होती उडी
चिपळूण : वाशिष्ठी नदीत उडी घेतलेल्या दाम्पत्यामधील अश्विनी अहिरे हिचा मृतदेह तब्बल ४८ तासांच्या शोधमोहिमेनंतर हाती लागला आहे. शुक्रवारी सकाळी करंबवणे खाडीत धामणदिवीनजीक हा मृतदेह सापडला. मात्र, अश्विनीचा पती नीलेश अहिरे याचा मात्र अजूनही कोणताच ठावठिकाणा न लागल्याने त्याचा शोध सुरूच आहे. पोलिसांनी चारही बाजूने तपास सुरू ठेवला आहे.
शहरातील गांधारेश्वर येथील वाशिष्ठी पुलावरून नवदाम्पत्याने नदीत उडी घेतल्याचा प्रकार ३० जुलै रोजी घडला होता. तेव्हापासून एनडीआरएफ पथक, पोलिस व अहिरे यांचे नातेवाईक या दोघांचा शोध घेत आहेत. या शोधमोहिमेत तिसऱ्या दिवशी शुक्रवारी (१ ऑगस्ट) सकाळी धामणदिवी येथे खाडीकिनारी अश्विनी अहिरे यांचा मृतदेह सापडला. कामथे येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
अश्विनी व नीलेश अहिरे यांच्या आत्महत्येच्या घटनेने संपूर्ण अहिरे कुटुंब हादरून गेले आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर साक्री धुळे येथून अनेक नातेवाईक चिपळुणात दाखल झाले असून, तेही शोधमोहिमेत सहभागी झाले होते. नीलेशचा शोध लागेपर्यंत ही मोहीम सुरूच ठेवली जाणार असून, त्यासाठी नातेवाईकांनीही स्वतंत्र बोटीची व्यवस्था केली आहे. अश्विनी व नीलेश यांनी आत्महत्येचा निर्णय का घेतला, याविषयी अद्याप उलगडा झालेला नाही. पोलिस यंत्रणा या घटनेचा चारही बाजूने तपास व चौकशी करीत आहे.