रत्नागिरीत नेमणार तात्पुरते शिक्षक, मानधनातही केली वाढ; पालकमंत्री उदय सामंतांची घोषणा
By मनोज मुळ्ये | Updated: June 21, 2023 18:12 IST2023-06-21T17:51:41+5:302023-06-21T18:12:51+5:30
रत्नागिरी जिल्ह्यात शिक्षकांच्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त

रत्नागिरीत नेमणार तात्पुरते शिक्षक, मानधनातही केली वाढ; पालकमंत्री उदय सामंतांची घोषणा
रत्नागिरी : जिल्ह्यात शिक्षकांच्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. न्यायालयीन खटल्यामुळे भरती थांबली आहे. मात्र मुलांचे शिक्षण थांबू नये, यासाठी ७०० ते १००० तात्पुरते शिक्षक नेमण्यात येतील. ही भरतीही ग्राम पातळीवरच केली जाईल, अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.
रत्नागिरीत बुधवारी एका पत्रकार परिषदेत त्यांनी या महत्त्वपूर्ण निर्णयाची घोषणा केली. जिल्ह्यातील ६२७ शिक्षकांची आंतरजिल्हा बदली झाली आहे. आधीच शिक्षकांच्या जागा रिक्त होत्या. त्यात या जिल्हा बदलीमुळे रिक्त जागांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
शिक्षक भरतीबाबत न्यायालयामध्ये खटला सुरू आहे. मात्र त्यामुळे भरती थांबली असली तरी शिक्षण थांबता नये, यासाठी ७०० ते १००० तात्पुरते शिक्षक नेमण्याचा निर्णय आपण घेतला आहे. इतर जिल्ह्यात अशा तात्पुरत्या शिक्षकांना पाच हजार रुपये मानधन दिले जात आहे. रत्नागिरी जिल्ह्यात अशा शिक्षकांना ९ हजार रुपये मानधन दिले जाणार आहे. त्यासाठी ११ महिन्यांचा करार केला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
ही भरती गावपातळीवरच केली जाणार आहे. ज्या गावातील शाळेत रिक्त जागा आहे, त्याच गावातील पात्र उमेदवार त्यासाठी निवडला जाईल, असेही मंत्री सामंत यांनी सांगितले.