..तर तहसीलदारांचे निलंबन, आमदार भास्कर जाधवांच्या प्रश्नावर महसूल मंत्र्यांचे उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2025 15:53 IST2025-03-18T15:52:09+5:302025-03-18T15:53:00+5:30
चिपळूण : सक्शन पंपाने वाळू उत्खनन करणे हा गंभीर गुन्हा आहे. त्यामुळे ज्या-ज्या ठिकाणी सक्शन पंप लावून अवैधरीत्या वाळू ...

..तर तहसीलदारांचे निलंबन, आमदार भास्कर जाधवांच्या प्रश्नावर महसूल मंत्र्यांचे उत्तर
चिपळूण : सक्शन पंपाने वाळू उत्खनन करणे हा गंभीर गुन्हा आहे. त्यामुळे ज्या-ज्या ठिकाणी सक्शन पंप लावून अवैधरीत्या वाळू उत्खनन सुरू आहे त्या सर्व ठिकाणचे सक्शन पंप तहसीलदारांनी तत्काळ काढून टाकावेत, अन्यथा संबंधित तहसीलदारांचे निलंबन करून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे महसूलमंत्री चंद्रकांत बावनकुळे यांनी सोमवारी विधानसभेत सांगितले.
राज्याच्या वाळू धोरणावर सभागृहात चर्चा सुरू असतानाच आमदार भास्कर जाधव यांनी कोकणात हातपाटी वाळू उपसा हा पारंपरिक व्यवसाय आहे. त्याला आमचा विरोध नाही; परंतु अनेक ठिकाणी सक्शन पंप लावून मोठ्या प्रमाणात वाळू उत्खनन केले जात आहे. त्याला फक्त वाळू व्यावसायिक नव्हे, तर सरकारी कर्मचारीही जबाबदार आहेत. सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वरदहस्ताशिवाय कोणतेही अवैध धंदे चालू शकत नाहीत. अशांवर कारवाई करणार का, असा प्रश्न विचारला.
त्यावर उत्तर देताना मंत्री बावनकुळे म्हणाले, सरकारचे वाळू धोरण येत्या काही दिवसांत जाहीर होणार आहे. त्याचा मसुदा अंतिम टप्प्यात आहे. सदस्यांच्या काही सूचना असतील तर त्यांनी जरूर द्याव्यात, तसेच आमदार जाधव यांनी उपस्थित केलेला सक्शन पंपाचा मुद्दा अतिशय गंभीर आहे. सक्शन पंपाने वाळू उत्खनन करणे हा गंभीर गुन्हा आहे. त्यामुळे आजच मी कोकण आयुक्तांना आदेश देतोय की, तत्काळ सक्शन पंप बंद करण्यात यावेत. तहसीलदारांनी ही कारवाई केली नाही, तर संबंधित तहसीलदारावर तातडीने निलंबनाची कारवाई करण्यात येईल, अशा शब्दांत बावनकुळे यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली.