शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, १ तासांत सर्व GR काढा, मग अंतिम निर्णय सांगतो: मनोज जरांगे पाटील
2
Manoj Jarange: मनोज जरांगे आजच उपोषण सोडणार? हैदराबाद गॅझेटचा जीआर निघणार, सातारा गॅझेटीयरची जबाबदारी शिवेंद्रराजेंनी घेतली...
3
"कुठलाही विषय असू दे, मी नेहमी धावून जातो, पण...!" जरांगेंच्या आंदोलनावर उदयनराजेंची पहिली प्रतिक्रिया; स्पष्टच बोलले
4
मराठा आरक्षणाबाबत मोठी बातमी! अंतिम मसुदा घेऊन सरकारचे ४ मंत्री मनोज जरांगेंच्या भेटीला
5
Viral Video : गर्लफ्रेंडचा फोन सतत लागत होता व्यस्त, संतापलेल्या बॉयफ्रेंडनं काय केलं बघाच!
6
Maratha Protest: मनोज जरांगे यांच्या पत्नी आणि मुलांचाही अन्नत्याग; मुलगी म्हणाली...
7
८ वर्षांपूर्वी गायब झालेला 'रीलस्टार' पती, सतत शोध घेत होती पत्नी! आता समोर आलं धक्कादायक सत्य
8
शेअर बाजारापेक्षा जास्त परतावा देणारी सरकारी योजना; EPF का ठरत आहे सरस? संपूर्ण गणित समजून घ्या
9
Video: आझाद मैदान परिसरात तणावाची स्थिती, आंदोलकांनी वाट अडवली; पोलिसांनी अतिरिक्त कुमक मागवली
10
Anant Chaturdashi 2025: अनंत चतुर्दशीला का बांधला जातो अनंताचा धागा? हे व्रत गणेशाचे नाही तर... 
11
नाशिकच्या राहुल धोत्रे हत्या प्रकरणातील फरार दोघांना बेड्या, पोलीस माजी नगरसेवक निमसेच्या मागावर
12
भाक्रा धरणापासून एअरबेसपर्यंत पाकिस्तानला दिली माहिती; प्रसिद्ध युटयूबर विरोधात आरोपपत्र दाखल
13
"पूर नव्हे, हा तर देवाचा आशीर्वाद"; पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी जनतेला दिला अजब सल्ला! म्हणाले...
14
'आंदोलक रस्त्यावर नाचताहेत म्हणून तुम्ही न्यायमूर्तींना पायी कोर्टात जायला भाग पाडू शकत नाही'; उच्च न्यायालयाने सरकारला झापले
15
'सरकारचा एकही प्रतिनिधी मनोज जरांगे पाटलांना भेटायला आला नाही,' रोहित पवारांची टीका
16
सेबीचा नवा नियम! F&O ट्रेडिंगमध्ये १ ऑक्टोबरपासून पोझिशन लिमिट वाढणार; लहान गुंतवणूकदारांना फायदा
17
स्वार्थी ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'नंतरही भारताची अर्थव्यवस्था 'बम-बम'! ग्रोथ पाहून पंतप्रधान मोदीही खूश; स्पष्टच बोलले...
18
“बस… जरांगे आता थांबा! आंदोलन संपवून सरकारला सहकार्य करा, नामुष्की टाळा”; कुणी दिला सल्ला?
19
'या' देशात भाड्याने मिळते पत्नी; लग्न करून एकत्रही राहू शकता, पण मोजावे लागतील 'इतके' पैसे!
20
"काँग्रेसच्या स्टेजवरून माझ्या आईला शिवी दिली, हा अपमान..."; पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले भावूक

समुद्रात असे तयार होतात टार बॉल्स, जलचरांवर होतो गंभीर परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2018 11:54 IST

किनाऱ्यावर येणार टार बॉल्स आणि त्याचे मत्स्य उत्पादनावर होणारे परिणाम याविषयी सविस्तर विश्लेषण करणारे भाष्य

- डॉ. स्वप्नजा आशिष मोहिते

दैनिक लोकमतमध्ये आणि ऑनलाईन लोकमतमध्ये टार बॉल्स याविषयी सविस्तर वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्याअनुषंगाने किनाऱ्यावर येणार टार बॉल्स आणि त्याचे मत्स्य उत्पादनावर होणारे परिणाम याविषयी सविस्तर विश्लेषण करणारे भाष्य.

जुहूच्या किनाऱ्यावर तेल किंवा वंगणयुक्त टार बॉल्स येऊन हा किनारा प्रदूषित झाला आहे. तेलकट आणि चिकट असा हा थर किनाऱ्यावर पसरला आहे. समुद्रात टाकल्या गेलेल्या आणि पाण्यावर तरंगणाऱ्या तेलामुळे हे टार बॉल्स तयार होतात. समुद्रातील क्षार आणि इतर घटकांबरोबर प्रक्रिया होऊन तेलाचे अशा चिकट टार मध्ये रूपांतर होते. याला विदरिंग (weathering) म्हणतात. समुद्रातील तेल विहिरींतून झालेल्या तेल गळतीमुळे किंवा बोटीतून सोडल्या जाणाऱ्या तेलामुळे, समुद्राच्या पाण्यावर तेलाचा एक पातळ थर (slick ) तयार होतो. वारा, लाटा आणि पाण्यातील प्रवाहांमुळे हा थर विखुरतो. सुरुवातीस या तेलातील हलक्या  घटकांचे बाष्पीभवन होते किंवा ते पाण्यात मिसळून जातात. तेलातील जड घटक (क्रूड ऑइल) पाण्यात राहतात आणि कालांतराने त्याचे रूपांतर या चिकट आणि घट्ट गोळ्यांमध्ये होते. असे थोडक्यात म्हणता येईल. पण या मागील कारण मीमांसा जाणून घेणे महत्वाचे ठरेल.  

टार बॉल्स तयार का होतात?

हे टार बॉल्स प्रत्येक वेळेसच समुद्रात झालेल्या तेल गळतीमुळेच होतात असे नाही. समुद्राच्या तळावर असणाऱ्या फटींमधून ही तेलाचा नैसर्गिकरित्या रिसावं होत असतो. तेल गळती समुद्रातून नैसर्गिकरित्या होणारी असो, समुद्रातून तेल काढणाऱ्या तेल विहिरीतून होणारी असो किंवा मासेमारी अथवा कार्गो आणि प्रवासी बोटींमधून होणारी असो, हे तेल पाण्यावर तरंगत राहते आणि त्यात रासायनिक आणि भौतिक बदल होऊन असे घट्ट आणि चिकट गोळे तयार होतात. प्रवाहाबरोबर वाहत जाऊन ते किनाऱ्यापाशी येतात. 

टार बॉल्स तयार होण्यामागील काही कारणे सांगता येतील. अंतर्गत तेल वाहतूक करणाऱ्या बोटी साधारणपणे किनाऱ्यापासून २० कि.मी. अंतरावरून मार्गक्रमण करतात. आपल्या परतीच्या प्रवासात बरेचदा या टँकर बोटी समुद्राचे पाणी गरम करून त्याने आपले रिकामे टँक्स धुतात आणि ते तेलमिश्रित पाणी समुद्रात सोडतात. खरं तर आंतरराष्ट्रीय नियमांनुसार अशा प्रकाराने समुद्रात तेल प्रदूषण होऊ नये म्हणून कायदे आहेत. पण भारताच्या किनारपट्टीवर अशा गोष्टींवर फारसे निर्बंध नसल्याने अशा प्रकारे तेल समुद्रात मिसळू शकते. ही एक छोटी तेल गळती म्हणता येईल. पाण्यावर तरंगणारा हा तेलाचा पट्टा वाऱ्यामुळे आणि प्रवाहांमुळे आणखी पसरत जातो. त्यात जैविक, भौतिक आणि रासायनिक बदल होऊन त्याचे असे गोळे बनतात आणि ते किनाऱ्याकडे ढकलले जातात.

काही वेळेस समुद्रात दोन बोटींची धडक झाल्यास त्यामधील तेल गळून ही असे घडू शकते. अर्थात अशी शक्यता खूप कमी असते. समुद्रातील इंधन विहिरीतून अपघाताने तेल गळती होऊ शकते. मासेमारी करणाऱ्या  किंवा प्रवाशी वाहतूक करणाऱ्या किंवा कार्गो बोटीतून काही प्रमाणात अशी तेल गळती होऊ शकते. तेल गळती झाल्यानंतर त्याचे टार बॉल्समध्ये रूपांतर होण्यासाठी तेलातील घटक, वाऱ्याची दिशा आणि वेग तसेच कालावधी हे महत्वाचे असतात. तेल जेव्हा पाण्यात तरंगत असते तेव्हा लाटा आणि वाऱ्यामुळे ते पाण्यासोबत घुसळले जाऊन त्याचे इमल्शन तयार होते. हे साधारणपणे चॉकोलेट पुडिंग सारखे दिसते. मूळ तेलापेक्षा घट्ट आणि अप्रवाही अशा या  इमल्शनचे आणखी तुकडे होत राहतात. अगदी छोट्या गोळ्यांपासून १० ते ३० से.मी. असे हे टार बॉल्स समुद्राच्या पाण्यावर त्यांची घनता पाण्यापेक्षा कमी असल्याने तरंगत राहतात.   

समुद्रात गळती झालेले तेल काही प्रक्रियांतून जाते. प्रथम कमी रेण्विक वस्तुमान असलेल्या  घटकांचे बाष्पीभवन (evaporation ) होते. उरलेले तेल ऑईल स्लिकच्या स्वरूपात समुद्रात पसरते. त्यातील काही बेन्झीन आणि टोलीनसारखे काही घटक पाण्यात विरघळतात. पाण्यात विरघळणारे हे घटक जलचरांसाठी अधिक हानिकारक ठरतात.उर्वरित तेल लाटांमुळे घुसळले जाऊन त्याचे लहान मोठे थेंब तयार होतात. समुद्राच्या पाण्याचे आणि तेलाचे थेंब यांचे मिश्रण तयार होते आणि हे इमल्शन प्रवाहांबरोबर दूर वाहत जाते. सांडलेल्या तेलाच्या प्रमाणाच्या पाचपट हे इमल्शन असते. चॉकलेटच्या पेस्टसारख्या दिसणाऱ्या या अशा स्थिर इमल्शनला चॉकलेट मूस म्हटले जाते. हे मिश्रण किनाऱ्यावर येताना त्याचे आणखी लहान मोठे गोळे बनत जातात आणि किनाऱ्यावर त्यांचा थर बसतो.  

विदरिंगमुळे तयार झालेले हे टार बॉल्स बाहेरून काहीसे कडक असले तरी आत ते मऊ, चिकट आणि लिबलिबीत असतात. पाण्याच्या घुसळण्याने तसेच वाढत्या तापमानाने हे बॉल्स फुटून त्यातला हा चिकट द्रव बाहेर येतो. काहीसा उन्हात वितळलेल्या डांबरासारखा हा द्रव दिसतो. जेवढे तापमान वाढते तेवढा यांचा चिकटपणा ही वाढतो. हे गोळे कित्येक कि.मी. दूरवर वाहत जातात. समुद्रातील पर्यावरणात त्यांचे विघटन होत नाही. समुद्रातील काही सूक्ष्म कण किंवा वाळूचे कण यांना हे टार बॉल्स चिकटतात आणि किनाऱ्यावर त्यांचा अतिशय चिकट असा थर बसतो. हे गोळे एवढे चिकट असतात की हात-पायांना किंवा कपड्यांना चिकटले तर ते स्वच्छ करणे कठीण होऊन जाते. जेवढी वाळू आणि इतर कचरा या गोळ्यांना चिकटेल तेवढा तो साफ करणे कठीण बनते. हे गोळे किती काळ चिकट राहतील हेही सांगणे कठीण असते. काही वेळेस अशा गोळ्यांची घनता जास्त असेल तर ते पाण्यात बुडून तळाशी जातात आणि तेथे खूप काळ राहू शकतात. 

टार बॉल्सची ही समस्या जगभरातील समुद्र किनाऱ्यांवर आता प्रकर्षाने जाणवू लागली आहे. आपल्या किनारपट्टीवर गोव्याच्या किनाऱ्यावर १९७० मध्ये मोठ्या प्रमाणावर असे टार बॉल्स आल्याची  नोंद आहे. अशाच घटना बर्मुडा, गल्फ किनारे तसेच अमेरिका आणि इतर देशांच्या किनाऱ्यांवर ही घडत आहेत. असे टार बॉल्सनी प्रदूषित किनारे पर्यटक आणि नागरिक यांना बंद करणे हाच उपाय मग अवलंबावा लागतो. हे टार बॉल्स हाताने किंवा यंत्रांच्या साहाय्याने उचलावे लागतात. काही वेळेस तर वाळूचा टारने माखलेला सगळाच थर काढून टाकावा लागतो. आता काही रसायनाची फवारणी करून किनारे स्वच्छ केले जातात. २०१५ साली लॉस एंजेलिसच्या किनाऱ्यावर असेच टार बॉल्स येण्याची घटना घडली होती.  अभ्यास केला असता १६० कि.मी. अंतरावर असलेल्या सांता बार्बरा येथे झालेल्या तेल गळतीतून जवळ जवळ ८०००० लि. तेल समुद्रात मिसळण्याने हे घटना घडल्याचे दिसले. 

टार बॉल्स किनाऱ्यावर का आणि कधी येतात?

समुद्राचे प्रवाह, लाटा, वाऱ्याची दिशा, वाऱ्याचा वेग यावर या टार बॉल्सचा प्रवास अवलंबून असतो. गोव्याच्या समुद्र विज्ञान संस्थेने केलेल्या अभ्यासानुसार आपल्या किनाऱ्यांवर मे ते ऑक्टोबर दरम्यान असे टार बॉल्स येण्याचे प्रमाण अधिक आढळते. याचे कारण म्हणजे पश्चिम किनारपट्टीवर वाहणाऱ्या वाऱ्यांची दिशा म्हणता येईल. या किनाऱ्यावर वारे एका विशिष्ट्य वार्षिक चक्रानुसार वाहतात. साधारणपणे मे महिन्यापासून किनाऱ्याकडे वारे वाहायला लागतात. या मान्सून वाऱ्याचा वेग वाढत जाऊन तो जुलै-ऑगस्ट मध्ये सर्वाधिक होतो. सप्टेंबर-ऑक्टोबर पासून त्याचा वेग मंदावतो. 

समुद्राच्या पृष्ठभागावर निर्माण होणाऱ्या लाटांचा ही वेग आणि मार्ग या मान्सून वाऱ्याप्रमाणेच असतो. यामुळे लाटांची उंची आणि वेग ही वाढत जातो. अशा लाटा या टार बॉल्सना उत्तमरित्या वाहून नेतात. यामुळेच समुद्रात झालेल्या तेल गळतीतून तयार झालेले टार बॉल्स या कालावधीत किनाऱ्याकडे येतात. जर तेल गळती किनाऱ्यानजीक झाली असेल तर त्या तेलाचे टार बॉल्स न बनता, तपकिरी रंगाचे इमल्शन किनाऱ्यावर येऊन पडते. पण ही तेल गळती खोल समुद्रात झाली असेल तर किनाऱ्याकडे येत येत त्याचे टार बाल्समध्ये रूपांतर होऊन हे चिकट गोळे किनाऱ्यावर येऊन पडतात. काही वेळेस वाऱ्याची दिशा बदलली तर हे गोळे परत समुद्राकडे ढकलले जाऊ शकतात. समुद्रात ते किती काळ राहू शकतील याबाबत निश्चित अंदाज मात्र बांधता येत नाही. 

टार बॉल्समुळे सागरी जीवांवर होणारा परिणाम 

अंदाजे ३.५ अब्ज टन एवढे पेट्रोलियम हायड्रोकार्बन प्रतिवर्षी  नैसर्गिकरित्या तसेच अपघाताने, मानवी हस्तक्षेपाने सागरी पर्यावरणात मिसळत असते. हायड्रोकार्बनचे विघटन करणारे सागरी जीवाणू अशा तेल गळतीमधील तेलावर प्रक्रिया करून त्यांचे विघटन करू शकतात. हे जीवाणू काही हायड्रोकार्बन्स वापरून ते स्वतः साठी अन्न निर्मिती करतात आणि पर्यायाने अन्नसाखळीतील इतर जीवांचे भक्ष बनतात. पण मोठे रेणू असलेल्या हायड्रोकार्बन्सचे असे जैविक विघटन होत नाही व ते सागरी पर्यावरणात खूप काळ राहू शकतात. उदा. अस्फाल्टीन्स समुद्रात जवळपास शंभर वर्षे निष्क्रिय अवस्थेत राहू शकतात. ही तेल गळती सागरी पर्यावरणातील सर्वच सजीवांना घातक असते. या तेल गळतीचा किंवा टार बॉल्सचा  ज्या फटका किनाऱ्याला बसतो तेथील अगदी सूक्ष्म जीवांपासून ते तेथील पक्षी, सस्तन प्राणी अगदी वनस्पतीही मृत होऊ शकतात. जलचरची अंडी आणि पिल्ले हे या प्रदूषणाला सर्वप्रथम बळी पडतात.  

अनेक जलचर हे टार बॉल्स खाद्य समजून खातात. हे त्यांच्यासाठी अतिशय घातक ठरते. किनाऱ्यावर येऊन पडणारे हे चिकट गोळे वाळूत घरटी करून राहणाऱ्या पक्ष्यांना ही हानिकारक ठरतात. त्यांची पिसे चिकट झाल्याने ते उडू शकत नाहीत. भक्ष्य मिळवण्यासाठी समुद्रात बुडी मारणारे पक्षी ही या चिकट गोळ्यांनी माखून हालचाल करण्यास असमर्थ ठरतात. समुद्राच्या पृष्टभागावर तरंगणारे तेल किंवा हे गोळे तेथील प्राणी आणि वनस्पती, सर्वांनाच जीवघेणे ठरू शकतात. हे तेलाचे गोळे समुद्रात आणि किनाऱ्यावर दूरगामी परिणाम करतात. सर्वात जास्त परिणाम करणारी गोष्ट म्हणजे हे सजीव या तेलाने माखून जाणे. हे तेल श्वसन मार्गाने शरीरात ही जातेच. शरीर स्वच करण्याच्या प्रयत्नात किंवा खाद्य म्हणून ते अन्नमार्गात ही जाते. माशांच्या किल्ल्यांवर या तेलाचा थर जमा होऊन श्वसनात अडथळे येतात. सागरातील सूक्ष्म प्लवंग तर या तेलाच्या गोळ्यांमध्ये गुरफटून जातात आणि अन्नसाखळीतील हा महत्वाचा दुवा नष्ट होतो. किल्ल्याच्या मदतीने अन्नकण गाळून घेणारे मृदुकाय प्राणी, उदा. शिंपलावर्गीय प्राणी हे ही या तेल गोळ्यांना बळी पडतात. एकूणच समुद्रातील वेगवेगळ्या अन्नसाखळ्या यामुळे धोक्यात येतात आणि नष्ट होऊ लागतात. यातील प्रत्येक सजीवाच्या प्रत्येक इंद्रिय संस्थांवर या प्रदूषणाचा परिणाम होतो. हे जलचर जर या तेल गोळ्यांच्या संपर्कात अधिक काळ राहिले तर त्यांचा मृत्यू होतो. या टार बॉल्समुळे समुद्रांतर्गत असणाऱ्या तसेच किनाऱ्यावरील परिसंस्था धोक्यात येतात.

हे टार बॉल्स आपल्यासाठी हानिकारक आहेत का?

तेलाचे हे चिकट गोळे शरीराच्या संपर्कात आले तर त्याची अॅलर्जीसारखी रिअॅक्शन येऊ शकते. यातील हायड्रोकार्बन्स असतात. यामुळे अंगावर रॅश किंवा पुरळ येणे, खाज सुटणे अशा गोष्टी होऊ शकतात. त्यामुळे या गोळ्यांना स्पर्श न करणे चांगले. त्यांच्या संपर्कात आल्यास, तो भाग साबणाने किंवा वंगण काढण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सोल्यूशनने चांगला स्वच्छ  करावा. मात्र यासाठी केरोसीन, पेट्रोल, डिझेल किंवा इतर विद्रावक पदार्थाचा उपयोग करू नये. तसेच अशा तेलाने माखलेले किंवा तेलकट वास असलेले मासे, शिंपले, खेकडे आदी खाऊ नयेत.

टार बॉल्सनी माखलेला किनारा स्वच्छ कसा केला जातो?

तेल गळती समुद्रातच रोखता येऊ शकते. मात्र यासाठी योग्य नियोजन करावे लागते. पाण्यापेक्षा हलके असलेले तेल समुद्राच्या लाटांमुळे घुसळून त्याचे इमल्शन बनल्यानंतर टार बॉल्स बनण्याची प्रक्रिया सुरु होते आणि तो तेलाचा तवंग पुढे पसरत जातो. यासाठी काही कालावधी लागतो. यादरम्यानच पाण्यावर तरंगणारा तेलाचा तवंग काही डिस्पर्सन्ट वापरून रोखता येतो. ही  रसायने तेलावरील पृष्ठीय ताण कमी करून तेलाचे छोट्या कणात रूपांतर करतात आणि हे कण समुद्रात बुडतात. टाईप एक प्रकारचे हे डिस्पर्सन्टस हायड्रोकार्बन्स विद्रावक असतात आणि ते बोटीवरून फवारता येतात. ग्लायकॉल मिश्रित काही डिस्पर्सन्टस तेलाने माखलेले किनारे स्वच्छ करण्यासाठी वापरतात. बायोडिस्पर्स, डिस्पर्सइट, नोकोमीस, कोरेक्सिट असे जागतिक मान्यतेचे  डिस्पर्सन्टस तेल गळती आटोक्यात आणण्यासाठी किंवा समुद्र किनारे साफ करण्यासाठी वापरले जातात.  

तेल गळती आणि त्या नंतर त्याचे होणारे परिणाम ह्या समस्यांवर मात करण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात आहेत. योग्य नियोजन, जागरूकता आणि प्रशासन ते सामान्य जनता यांचा सहभाग या माध्यमातून टार बॉल्सच्या प्रश्नावर उपाय करता येऊ शकतील.

लेखिका मत्स्य महाविद्यालय रत्नागिरी येथील प्राध्यापिका आहेत. 

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी