रत्नागिरी-नागपूर महामार्ग रुंदीकरणाला गती, चौपदरीकरणातील बांधकामे हटविली
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2024 16:41 IST2024-12-03T16:41:33+5:302024-12-03T16:41:58+5:30
रत्नागिरी : मिऱ्या- रत्नागिरी - नागपूर राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाच्या जागेत असलेली ८ बांधकामे तालुका प्रशासनाकडून सोमवारी हटविण्यात आली. ही ...

रत्नागिरी-नागपूर महामार्ग रुंदीकरणाला गती, चौपदरीकरणातील बांधकामे हटविली
रत्नागिरी : मिऱ्या-रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाच्या जागेत असलेली ८ बांधकामे तालुका प्रशासनाकडून सोमवारी हटविण्यात आली. ही बांधकामे असलेल्या जागेचा मोबदला प्रशासनाकडून आधीच देण्यात आला होता. मात्र, तरीही त्यावरील ताबा न सोडल्याने ही बांधकामे पोलिस संरक्षणात हटविण्याचे काम सोमवारपासून सुरू झाले आहे.
मिऱ्या-रत्नागिरी-नागपूर या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाला आता सुरुवात झाली आहे. हा महामार्ग शहरानजीकच्या मिऱ्या येथून सुरू होत आहे. याचे काम टप्प्याटप्प्याने सुरू आहे. यात रत्नागिरी आणि संगमेश्वर तालुक्यांतील २९ गावांचा समावेश आहे. या महामार्गाच्या भूसंपादनाची जबाबदारी रत्नागिरी उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडे देण्यात आली आहे. रत्नागिरीतील समावेश असलेल्या जमीनदारांना या जागेचा मोबदला देण्यात आला आहे. त्यानंतर या जमीनमालकांना जागेचा ताबा सोडण्याबाबत वारंवार नोटीसही पाठविण्यात आल्या आहेत. मात्र, काहींनी अजूनही जमिनीचा ताबा सोडलेला नाही.
पावसाळ्यानंतर या महामार्गाचे काम द्रूतगतीने सुरू झाले आहे. त्यामुळे या घरांचा अडसर या कामाला होणार होता. शहरातील उद्यमनगर येथील झाडगाव ते कारवांची वाडी यादरम्यान अशी १५ बांधकामे आहेत. महामार्गाचे काम जलद गतीने सुरू असल्याने ही बांधकामे तोडणे गरजेचे होते. मात्र, कल्पना देऊनही या जमीनमालकांनी या जमिनीचा अद्याप ताबा सोडलेला नव्हता.
त्यामुळे सोमवारी यापैकी चंपक मैदान ते साळवी स्टाॅप यादरम्यानची ८ बांधकामे पोलिस संरक्षणात हटविण्यात आली. यावेळी तहसीलदार राजाराम म्हात्रे उपस्थितीत होते. उर्वरित ७ बांधकामे मंगळवारी हटविण्यात येणार असल्याचे तहसीलदार म्हात्रे यांनी सांगितले.
ही कारवाई सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलिस, भूसंपादन, भूमी अभिलेख आणि महसूल यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात येत आहे. यावेळी या विभागाचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.