व्हेल माशाच्या उलटीची तस्करी, पोलिसासह चौघांना अटक; दापोली सीमाशुल्क विभागाची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 12:11 IST2025-10-20T12:11:21+5:302025-10-20T12:11:51+5:30
पोलिस यंत्रणेत खळबळ

व्हेल माशाच्या उलटीची तस्करी, पोलिसासह चौघांना अटक; दापोली सीमाशुल्क विभागाची कारवाई
दापोली : दापोली सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्हेल माशाच्या उलटीच्या तस्करीचा पर्दाफाश करत चौघांना अटक केली आहे. अटक केलेल्या चाैघांमध्ये दाभाेळ सागरी पाेलिस स्थानकातील एका कर्मचाऱ्याचा समावेश आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि.१७) पहाटे दापाेली एस. टी. स्टँड येथे करण्यात आली.
संजय धाेपट (रा. दाभाेळ) या पाेलिस कर्मचाऱ्यासह युवराज माेरे (रा. मुंबई), नीलेश साळवी (रा. रत्नागिरी) आणि शिराज शेख (रा. मुंबई) यांना अटक करण्यात आली आहे. मुंबईतून दापाेलीकडे व्हेल माशाच्या उलटीची तस्करी हाेणार असल्याची माहिती सीमाशुल्क विभागाला मिळाली हाेती. त्यानंतर सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचला. शुक्रवारी पहाटे एका कारचा पाठलाग करून दापोली एस. टी. स्टँडजवळ त्यांना अडवण्यात आले. गाडीची तपासणी केली असता व्हेल माशाच्या उलटीचा साठा सापडला.
सीमाशुल्क विभागाला या तपासणीत ४ किलाे ८३३ रुपयांची व्हेल माशाच्या उलटीचा साठा सापडला. या साठ्यासह कारही जप्त करण्यात आली आहे. दरम्यान, अटक केलेल्या चाैघांना न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन काेठडी सुनावण्यात आली आहे.
एक पाेलिस तर तिघे एकमेकांचे नातेवाइक
सीमाशुल्क विभागाने अटक केलेल्यामध्ये संजय धाेपट हा पाेलिस कर्मचारी आहे. त्याच्या सहभागाने पाेलिस दलात खळबळ उडाली आहे तर अन्य तिघे एकमेकांचे नातेवाइक असल्याचे तपासात समाेर आले आहे. या चाैघांनी व्हेल माशाची उलटी कुठून आणली याचा शाेध सुरू आहे.