रत्नागिरी जिल्हा रुग्णालयाच्या रक्तपेढीत रक्ताची तीव्र टंचाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 18:15 IST2025-11-12T18:15:00+5:302025-11-12T18:15:24+5:30
गंभीर रुग्णांसाठी रक्तपुरवठा नियमित ठेवण्याचे आव्हान

रत्नागिरी जिल्हा रुग्णालयाच्या रक्तपेढीत रक्ताची तीव्र टंचाई
रत्नागिरी : येथील जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या रक्तपेढीतील रक्ताची गरज वाढली आहे. दरवर्षी या रक्तपेढीतून सुमारे पाच हजार रक्ताच्या पिशव्यांचे संकलन करावे लागत होते. मात्र, आता केवळ मोफत पुरवठा करण्यासाठी वर्षाला पाच हजार रक्ताच्या बॅगा लागत आहेत. रुग्णसंख्या वाढू लागल्याने सध्या मागणी वाढली आहे. त्यामुळे या रक्तपेढीला रक्ताची तीव्र टंचाई भासू लागली आहे.
रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या रक्तपेढीवर जिल्ह्यातील रुग्ण अवलंबून असतात. आता शासनाने सर्वच घटकांसाठी उपचार मोफत केल्याने जिल्हा शासकीय रुग्णालयासह अन्य सरकारी दवाखान्यात येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. विविध आजारांंबरोबरच अपघातग्रस्त, थॅलेसेमिया, राष्ट्रीय कार्यक्रम, अपघात, ॲनेमिया, कर्करोग, डायलिसिस, शस्त्रक्रिया, सिझर, माजी सैनिक आदींसाठी मोफत रक्तपुरवठा केला जातो.
पूर्वी या रक्तपेढीची वार्षिक पाच हजार रक्त बॅगांची मागणी होती. मात्र, आता ही मागणी वाढली असून, मोफत पुरवठाच आता जवळपास पाच हजार बॅग इतका करावा लागत आहे. त्यामुळे आता या रक्तपेढीला रक्ताची गरज वाढली आहे. यासाठी वर्षभरात १४० ते १५० शिबिरांचे आयोजन करून सुमारे सात हजार रक्त बॅगांचे रक्तसंकलन करावे लागते. रक्तदाते, विविध सामाजिक संस्था, राजकीय-सामाजिक कार्यकर्ते यांच्या सहकार्यामुळे रक्ताचा पुरवठा अखंडित ठेवण्यास मदत होत आहे.
दिवाळीसारख्या दीर्घ सुटीच्या कालावधीत शासकीय रक्तपेढीला रक्ताची टंचाई जाणवत आहे. सद्य:स्थितीत अत्यंत गंभीर अवस्थेतील रुग्णांसाठी रक्ताची तातडीने गरज आहे. त्यामुळे दात्यांना तसेच विविध सामाजिक संस्थांना या रक्तपेढीतर्फे रक्तदानासाठी तसेच शिबिरे आयोजित करण्यासाठी आवाहन केले जात आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या रक्तपेढीतून दिवसाला किमान ४० ते ४५ रक्ताच्या पिशव्यांचा पुरवठा होत आहे. मागणी वाढल्याने सध्या रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. सद्य:स्थितीत अत्यंत गंभीर रुग्णांसाठी रक्ताची तातडीने गरज आहे. रक्तपेढी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे येऊन सकाळी १० ते ३ वाजेपर्यंत रक्तदान करावे. तसेच सामाजिक संस्थांनी शिबिरांचे आयोजन करून सहकार्य करावे. - डाॅ. अर्जुन सुतार, जिल्हा संक्रमण अधिकारी, जिल्हा शासकीय रक्तपेढी, रत्नागिरी